नवी दिल्ली - भारतातील पान मसाला कंपनीने फसवणूक केल्याचा आरोप जेम्स बॉन्ड म्हणजेच पियर्स ब्रॉसनननं केला आहे. हॉलिवूड अभिनेता पियर्स ब्रॉसनन पान बहारच्या जाहिरातीत झळकला होता. ही जाहिरात केल्यापासून पियर्स ब्रॉसनननं कोणत्या-न्-कोणत्या कारणांमुळे वारंवार चर्चेत होता. ही जाहिरातीनंतर त्याच्यावर टीकादेखील करण्यात आली. तसेच दिल्ली सरकारने पियर्स ब्रॉसननला कारणे दाखवा नोटीसही बजावली होती. यावर कंपनीनं फसवणूक केल्याचे उत्तर पियर्स ब्रॉसनननं दिलं आहे.
''पान मसाला आरोग्यासाठी हानिकारक आहे, हे मला जाहिरात करण्यापूर्वी सांगितले गेले नाही. ते सांगितले गेले असते तर मी ही जाहिरात स्वीकारली नसती. पान मसाला कंपनीने माझी फसवणूक केली. कंपनीने माझ्यासोबत केलेल्या करारात त्यांच्या उत्पादनामुळे काय नुकसान होऊ शकते याचा खुलासा केला गेला नाही. तसेच इतर अटी आणि शर्थी काय असतात याचीही माहिती मला दिली नाही'', असे स्पष्टीकरण पियर्स ब्रॉसननने दिले आहे.
दरम्यान, पान मसाला कंपनीसोबतचा करार संपल्याचंही पियर्सनं सांगितलं. तसेच तंबाखूजन्य पदार्थ किंवा आरोग्याला हानिकारक असलेल्या उत्पादनांविरोधात जी मोहीम सुरू आहे त्यात मी सर्वतोपरी सहकार्य करेन, असे आश्वासनही पियर्स ब्रॉसननने दिल्याचे दिल्ली आरोग्य विभागाचे अतिरिक्त संचालक एस. के. अरोरा यांनी सांगितले. शिवाय, अशा उत्पादनांच्या जाहिराती कधीही करणार नाही, असे त्यानं लेखी स्वरुपातही लिहून दिले आहे.