दिल्लीत बलात्कार आणि हत्या प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर त्यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, त्यांच्यावर कारवाईसाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. पीडितेचं वय ९ वर्षे होतं. याचिकाकर्ते मकरंद म्हादलेकर यांनी आरोप केला आहे की राहुल गांधी यांनी जुनेलाईन जस्टीस अॅक्ट आणि POCSO अॅक्टचं उल्लंघन केलं आहे.
हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार याचिकाकर्त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच ट्विटर आणि दिल्ली पोलिसांना राहुल गांधी यांच्या विरोधात कारवाई करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली आहे. "दोन्ही कायद्यांमध्ये कोणत्याही अल्पवयीन पीडितेच्या कुटुंबीयांसोबत फोटो शेअर करू शकत नाही अशी तरतूद आहे," असं याचिकेमध्ये म्हणण्यात आलं आहे. यासंदर्भात ११ ऑगस्ट रोजी सुनावणी होऊ शकते.
यापूर्वी राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगानं (NCPCR) ट्विटर आणि दिल्ली पोलिसांना पत्र पाठवत या प्रकरणी राहुल गांधींविरोधात कारवाई करण्यास सांगितलं होतं. कोणत्याही अल्पवयीन पीडितेच्य़ा कुटुंबीयांसोबत फोटो सोशल मीडियावर पोस्ट करणं जुवेनाईल जस्टिस अॅक्ट २०१५ च्या कलम ७४ आणि पॉक्सो कायद्याच्या कलम २३ चं उल्लंघन असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
राहुल गांधींचं ट्विटर तात्पुरतं सस्पेंड?राहुल गांधी यांनी दिल्लीतील बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर पीडितेच्या आई-वडिलांचा फोटो ट्वीट केला होता. त्यावर भाजपाकडून जोरदार आक्षेप घेण्यात आला. त्यानंतर ट्विटरनं राहुल गांधी यांचं ट्विट हटवलं होतं. पण त्यांचं ट्विटर अकाऊंट तात्पुरतं सस्पेंड करण्यात आल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला होता. परंतु ट्विटरनं दावा फेटाळल्यानंतर अकाऊंट तात्पुरतं लॉक करण्यात आल्याचं काँग्रेसनं म्हटलं होतं.