नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीदरम्यान पीलीभीतमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पीलीभीत बाजार समितीमधील निवडणूक नियंत्रण कक्षाच्या आसपास सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड झाली आहे. निवडणूक नियंत्रण कक्षात एकूण 52 सीसीटीव्ही बसवण्यात आले होते. त्यापैकी 34 कॅमेरे बिघडल्याचं लक्षात आल्यानंतर इलेक्शन ड्युटीवर तैनात असलेल्या अधिकाऱ्यांना धक्का बसला. सुरुवातीला एखाद्या राजकीय पक्षाचे नेते किंवा कार्यकर्त्यांचं हे कृत्य असल्याचा संशय सर्व अधिकाऱ्यांना होता.
निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार करण्याची तयारीही त्यांनी सुरू केली होती. मात्र, तक्रार करण्यापूर्वी या प्रकरणाची चौकशी केली असता, हा कारनामा माकडांनी केल्याचं निदर्शनास आलं. माकडांच्या एका टोळीनं बाजार समितीमध्ये तयार केलेल्या नियंत्रण कक्षात घुसून कॅमेऱ्यांची तोडफोड केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीलीभीतच्या एडीएमनं (ADM) सांगितलं की, बाजार समितीमध्ये तयार केलेल्या निवडणूक नियंत्रण कक्षाभोवती 52 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. एका सीसीटीव्ही कॅमेऱ्याची किंमत दोन हजार 500 रुपये होती. ईव्हीएम (EVM) आणि व्हीव्हीपीएटी (VVPAT) मशीन ठेवण्यासाठी मंडईच्या आवारात स्ट्राँग रूम तयार करण्यात आली आहे.
52 कॅमेऱ्यांपैकी 34 कॅमेऱ्यांचं नुकसान
रूमच्या सुरक्षेसाठी हे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. माकडांनी या 52 कॅमेऱ्यांपैकी 34 कॅमेऱ्यांचं नुकसान केलं आहे. एडीएम म्हणाले की, या माकडांना बाजार समितीच्या परिसरापासून दूर ठेवण्यासाठी तीन पथकं तैनात करण्यात आली आहेत. एका टीममध्ये नऊ सदस्य आहेत. या टीमनं आतापर्यंत सात माकडं पकडली आहेत. याशिवाय चोवीस तास 25 सुरक्षा कर्मचारी याठिकाणी तैनात केले आहेत. ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी मशीन स्वतंत्र खोलीत ठेवण्यात आली होत्या. त्यांचं अजिबात नुकसान झालेलं नाही, असंही ते म्हणाले. पीलीभीतच्या एडीएमनं दिलेल्या माहितीनुसार, खराब झालेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या जागी नवीन कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
सीसीटीव्ही कॅमेरे आणि कॉर्डच्या सुरक्षेसाठी त्यावर ग्रीस लावण्यात आलं आहे. जेणेकरून माकडं ते खराब करू शकणार नाहीत. मंडई परिसरातील निवडणूक नियंत्रण कक्ष आणि स्ट्राँग रूमच्या आसपास तैनात असलेल्या वनविभागाच्या पथक प्रमुखांनी सांगितलं की, उपपरिक्षेत्र अधिकाऱ्याकडे प्रत्येक पथकाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याशिवाय एक वन निरीक्षक आणि वनरक्षकही त्या ठिकाणी तैनात करण्यात आलं आहेत. त्यांच्यासोबत इतर 6 वन कर्मचाऱ्यांनाही ड्युटीवर ठेवण्यात आलं आहे. माकडांना मंडईच्या आवारापासून दूर ठेवणं आणि त्यांना पकडून जंगलात सोडण्याची जबाबदारी या टीम्सवर देण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.