आग्रा: उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील अनेक भागांमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. याचा फटका आग्रा येथील ऐतिहासिक वास्तू असलेल्या ताजमहालाला बसला आहे. या अतिवृष्टीमुळे गुरुवारी सकाळी ताजमहालाचा एक खांब कोसळला. ताजमहालाच्या दक्षिण दिशेला असणाऱ्या प्रवेशद्वारावरील खांब मुसळधार पावसामुळे मध्यरात्री कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेले नाही.
जा, शहाजहाँची सही असलेला कागद घेऊन या; वक्फ बोर्डाला सुप्रीम कोर्टाचा आदेश
कालच सर्वोच्च न्यायालयाने ताजमहालाच्या वास्तूसंदर्भात एक महत्त्वपूर्ण निकाल दिला होता. सन २००५ मध्ये उत्तर प्रदेशातील सुन्नी वक्फ बोर्डाने ताजमहल वक्फ बोर्डाची संपत्ती असल्याचं घोषित केले होते. 2010 साली भारतीय पुरातत्व विभागाने वक्फ बोर्डाच्या या निर्णयाला विरोध करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. या प्रकरणावर काल सुनावणी झाली. तेव्हा न्यायालयाने वक्फ बोर्डाला चांगलेच धारेवर धरले. ताजमहाल तुमच्या मालकीचा आहे, असा दावा तुम्ही करता. मग शहाजहाँची सही असलेला तसा कागद घेऊन या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. यासाठी न्यायालयाने वक्फ बोर्डाला आठवडाभराचा अवधी दिला आहे. ताजमहाल ही वक्फ बोर्डाची संपत्ती आहे, यावर देशात कोण विश्वास ठेवेल? तसेच अशा प्रकारची प्रकरणे न्यायालयात आणून न्यायालयाचा वेळ वाया घालवू नका, अशा शब्दांत न्यायालयाने वक्फ बोर्डाला फटकारले होते.