पंजाबनंतर आता राजस्थान...? 'कॅप्टन'च्या विकेटनंतर ‘पायलट’ सज्ज; राजस्थान काँग्रेसमध्येही बदलाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 09:13 AM2021-09-22T09:13:35+5:302021-09-22T09:14:19+5:30
पंजाबमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामाेडींचा शेवट कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या गच्छंतीमध्ये झाला.
जयपूर : पंजाबमध्ये काॅंग्रेसने नेतृत्वबदल केल्यानंतर राजस्थानमध्येही चर्चा सुरू झाली आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांना हटविल्यानंतर पंजाबचा फॉर्म्युला राजस्थानमध्येही वापरणार का, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यामुळे राजस्थानात सचिन पायलट यांच्या कंपूमध्ये आशा पल्लवित झाल्या आहेत.
पंजाबमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामाेडींचा शेवट कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या गच्छंतीमध्ये झाला. मात्र, राजस्थान काॅंग्रेसमध्ये आमूलाग्र बदलाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. राजस्थान काॅंग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री अशाेक गेहलाेत हे विराेधी गटाच्या अपेक्षा फार काळ लांबवू शकणार नाहीत. पंजाबमधील घडामाेडींनंतर माजी मुख्यमंत्री सचिन पायलट यांचा गट पुन्हा सक्रिय झाला आहे. पितृपक्ष पंधरवड्यानंतर राजस्थानमध्ये माेठे बदल हाेतील, अशी अपेक्षा काहींनी व्यक्त केली आहे.
संदेश काय?
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा देण्यापूर्वी राजस्थानचे प्रभारी आणि काॅंग्रेसचे सरचिटणीस अजय माकन आणि सचिन पायलट यांची राहुल गांधी यांच्यासाेबत चर्चा झाली हाेती. पंजाबमध्ये नेतृत्वबदलातून काॅंग्रेसने एक संदेश दिला आहे. त्यामुळे राजस्थानमध्ये काय हाेते, याकडे लक्ष लागले आहे.