जयपूर - वैमानिकाने कामाचे तास संपले असल्याचं सांगत विमानाचं उड्डाण करण्यास नकार दिल्याने जयपूर - दिल्ली प्रवास करणा-या प्रवाशांवर बसने प्रवास करण्याचा नामुष्की ओढवली. एलायन्स एअरलाइन्स ही एअर इंडियाची मालकी असलेली कंपनी आहे. जयपूर - दिल्लीसाठी एलायन्स एअरलाइन्सने 40 प्रवासी प्रवास करणार होते. मात्र वैमानिकाने आपले कामाचे तास संपले असून, उड्डाण करणार नाही असं सांगितल्याने विमान उड्डाणच करु शकलं नाही.
अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, यानंतर काही प्रवाशांसाठी बसची सुविधा करण्यात आली आणि त्यांना दिल्लीला पोहोचवण्यात आलं. उर्वरित प्रवाशांसाठी हॉटेलमध्ये राहण्याची सुविधा करण्यात आली होती. त्यांना सकाळी दुस-या विमानाने दिल्लीला पाठवण्यात आलं.
'वैमानिकाचे कामाचे तास संपले असल्या कारणाने तो उड्डाण करु शकत नव्हता', अशी माहिती जयपूरमधील संगनेर विमानतळाचे संचालक जे एस बल्हारा यांनी दिली आहे. नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) नियमांनुसार, सुरक्षेच्या कारणास्तव वैमानिकाच्या कामाचे तास वाढवले जाऊ शकत नाहीत.
'दिल्लीहून येणा-या वैमानिक आणि क्रू ने रात्रीच जयपूर ते दिल्ली विमानाचं (9I-644) उड्डाण करण अपेक्षित होतं. पण दिल्लीहून येणा-या विमानाला उशीर झाला आणि रात्री 1.30 वाजता जयपूरमध्ये विमानाचं लँडिंग झालं', अशी माहिती एअर इंडियाच्या एका कर्मचा-याने दिली आहे. डीजीसीएने आखून दिलेल्या नियमानुसार, वैमानिकाने आपल्या कामाचे तास वाढवू नयेत. यामुळेच वैमानिकाने मर्यादेपेक्षा जास्त काम करण्यास नकार देत उड्डाणाला नकार दिला.
काही प्रवाशांची हॉटेलमध्ये सोय करण्यात आली, तर काहींना रस्ते मार्गाने दिल्ली पोहोचवण्यात आलं. उर्वरित प्रवाशांची सकाळच्या विमानाने दिल्लीला पोहोचण्याची सोय करण्यात आली.