ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 21 - मुंबईहून लंडनला जाणा-या जेट एअरवेजच्या विमानाचे जर्मनीच्या हवाई क्षेत्रात एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटल्याच्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या आठवड्यातील गुरुवारी घडलेल्या या घटनेत विमानाचा एक पायलट झोपा काढत होता तर दुस-या पायलटने संपर्क प्रमाणी चुकीच्या फ्रिकवेन्सीवर ठेवल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे.
फ्लाइट 9W-118 मुंबई-लंडन विमानाचं थोड्या वेळेसाठी जर्मनीत एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला होता. त्यानंतर काही मिनिटांनी या विमानाशी संपर्क पुन्हा प्रस्थापित झाला. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव जर्मनीनं स्वतःच्या लढाऊ विमानांना पाठवलं. डीजीसीएसोबत सर्व अधिका-यांना याचा रिपोर्ट पाठवण्यात आला आहे. या विमानाच्या क्रू मेंबर्सला चौकशी पूर्ण होईपर्यंत कामावर न येण्यास सांगितलं आहे.
संपर्क तुटल्यावेळी जर्मनीला या 9W-118 विमानाचं हायजॅक झाल्याची भीती वाटल्यानं त्यांनी सुरक्षिततेसाठी हे पाऊल उचललं आहे. जर्मनीनं हवाई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बोइंग-777 या विमानाच्या सुरक्षेखातर दोन लढाऊ विमानांना हवेत पाचारण केलं. त्यानंतर 300 प्रवासी असलेलं हे विमान लंडनमध्ये सुरक्षितरीत्या उतरलं आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 9W 118 विमानाचा एक पायलट झोपा काढत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रवासादरम्यान एक पायलट विमानाचा कंट्रोल सांभाळात असेल तर दुसरा पालयल आराम करू शकेल, असा नियम आहे. मात्र, 9W 118 विमानाचा पायलट झोपा काढत होता त्यावेळी दुस-या पायलटने विमानाच्या संपर्क प्रमाणीला चुकीच्या फ्रीकवेन्सीवर ठेवून हलगर्जीपणा केल्याची बाब समोर आली आहे.
याशिवाय त्याने हेडसेटचा आवाजही कमी करुन ठेवला होता. यामुळे पायलटचा संपर्क जर्मन एटीसीसोबत होऊ शकला नाही. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी एअरलाइन आणि डीजीसीएकडून घेतली जाणार आहे, असे जेट एअरवेजने सांगितले आहे.