गया - भारताच्या चंद्रयान ३ मोहिमेचं देशभऱातून कौतुक आहे. चंद्रयानातील विक्रम लँडर बुधवारी सांयकाळी ६.०४ वाजता चंद्रावर उतरले. या लँडरचे सॉफ्ट लँडींग झाले अन् इस्रो कार्यालयात टाळ्या अन् आनंदोत्सव सुरू झाला. देशभरातून भारतीय नागरिक टीव्हीसमोर नजरा लावून बसले होते. अनेकांच्या हाती मोबाईल होते. प्रत्येकाला देशाभिमानाचा हा क्षण डोळ्यात साठवायचा होता. त्याचवेळी, बिहारच्या गया येथे एका कुटुंबात उत्सुकता आणि मनात धाकधूक होती. सकाळपासून घरी पूजा-अर्चना सुरू होती.
गया येथे पिठाची गिरणी चालवणाऱ्या महेंद्र प्रसाद यांचा मुलगा इस्रोमध्ये वैज्ञानिक असून तोही चंद्रयान ३ मोहिमेतील टीमचा भाग आहे. त्यामुळेच, सकाळपासून महेंद्र प्रसाद यांच्याघरी उत्कंठा शिगेला पोहोचली होती. सुधांशू कुमारची आई इंदु देवी पूजा-पाठ करत होती. सकाळपासून त्याच्या वडिलांची नजर टीव्हीवर होती. चंद्रयान ३ चे लँडींग यशस्वी झाल्याचे वृत्त समजले आणि कुटुंबात आनंदी आनंद झाल्याचे महेंद्र प्रसाद कुमार यांनी म्हटले.
सुधांशूचे वडिल घरीच पिठाणी गिरणी चालवतात. घरातील आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्याने सुधांशूने सरकारी शाळेतूनच शिक्षण घेतले. सुधांशून बारावीची परीक्षा पास केल्यानंतर एनआयटी कुरुक्षेत्र येथून सिव्हील स्ट्रीममध्ये बीटेक इंजिनिअरींग पूर्ण केले. याचदरम्यान, कॅम्पस सिलेक्शन प्रक्रियेतून त्यांची निवड झाली. जून २०१९ मध्ये तो एनसीबी फरीदाबाद येथे प्रोजेक्ट इंजीनियर पदावर रुजू निवड झाला. १ वर्ष येथे काम केल्यानंतर त्याने नोकरी सोडू दिली आणि IIT रुडकी येथून एमटेकचे शिक्षण पूर्ण केले.
एमटेकची पदवी प्राप्त केल्यानंतर सुधांशूने इस्रोची परीक्षा दिली आणि लॉकडाऊन काळात व्हिडिओ कॉन्फरेन्सिंगद्वारे मुलाखत दिली. त्यावेळी, इस्रोमध्ये वैज्ञानिक म्हणून सुधांशूची निवड झाली. नुकतेच, चंद्रयान ३ मिशनसाठी बेस बनवण्याच्या टीममध्ये त्याला सहभागी करून घेण्यात आले होते. आजचा दिवस सुधांशू आणि त्याच्या कुटुंबीयांसाठी आनंदाचा आणि कौतुकाचा आहे. म्हणूनच, परिसरातून सुधांशूच्या आई-वडिलांचे कौतुक होत आहे.
वडिलांना मदत म्हणून घरी पिठाची गिरणी चालवली, प्रसंगी मसाल्याचे पाकीटही विकले कॉन्वेंट स्कुलमध्ये शिक्षण घेण्याची ऐपत नसल्याने सरकारी शाळेतूनच शिक्षण पूर्ण केलं. आता, चंद्रयान मोहिमेतील सहभागातून आई-वडिलांच्या कष्टाचं जीझ केलं, कुटुंबांच्या संघर्षाचं पांग फेडलं.