रुग्णवाहिकेसाठी पैसे नव्हते, अखेर बहिणीने भावाचा मृतदेह टॅक्सीच्या छतावर बांधून केला १९५ किमी प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 22:54 IST2024-12-08T22:54:13+5:302024-12-08T22:54:38+5:30
या घटनेची दखल घेत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी घेत चौकशीचे आदेश दिले आणि अधिकाऱ्यांना दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

रुग्णवाहिकेसाठी पैसे नव्हते, अखेर बहिणीने भावाचा मृतदेह टॅक्सीच्या छतावर बांधून केला १९५ किमी प्रवास
मानवतेला लाजवेल अशी घटना उत्तराखंडच्या पिथौरागढ जिल्ह्यातून समोर आली आहे. खासगी रुग्णवाहिका परवडत नसल्याने मृतदेह टॅक्सीच्या टपावर ठेवून नेल्याची घटना घडली आहे. एका महिलेने आपल्या भावाचा मृतदेह टॅक्सीच्या छताला बांधला आणि १९५ किमी दूर असलेल्या पिथौरागढ जिल्ह्यातील एका गावात नेला. या घटनेची दखल घेत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी घेत चौकशीचे आदेश दिले आणि अधिकाऱ्यांना दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवानी (२२) नावाची मुलगी तिचा लहान भाऊ अभिषेक (२०) याच्यासोबत हल्दवानी येथे कामाला होती. शुक्रवारी अभिषेक कामावरून लवकर घरी आला आणि त्याने डोकेदुखीची तक्रार केली. नंतर तो रेल्वे रुळाजवळ बेशुद्धावस्थेत आढळून आला आणि त्याला उपचारासाठी सुशीला तिवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, हल्दवानी येथे नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर पोलिसांनी शनिवारी मृतदेह शिवानीच्या ताब्यात दिला.
शिवानीने आपल्या भावाचा मृतदेह घरी नेण्यासाठी शवागाराबाहेर उभ्या असलेल्या अनेक रुग्णवाहिका चालकांसोबत चर्चा केली. मात्र, रुग्णवाहिका चालकांनी १० ते १२ हजार रुपये भाडे मागितले. इतके पैसे तिच्याकडे नव्हते. तिने भाडे कमी करण्याची विनंती केली, पण कोणीही तिला मदत केली नाही. त्यामुळे भाडे भरू न शकल्याने तिने आपल्या गावातून एका टॅक्सी चालकाला बोलावले आणि आपल्या भावाचा मृतदेह टॅक्सीच्या छतावर बांधून तिला १९५ किलोमीटरचा प्रवास करावा लागला.
काय म्हणाले वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य?
दरम्यान, ही घटना रुग्णालयाबाहेर घडली आहे, त्यामुळे ही घटना रुग्णालयात घडली असती तर आम्ही मदत केली असती, असे सुशीला तिवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण जोशी यांना या घटनेबाबत विचारले असता ते म्हणाले. तर खासगी रुग्णवाहिकांवर कोणी लक्ष ठेवत नाही आणि रुग्णांना नेण्यासाठी मनमानी भाडे आकारले जात असल्याचे रुग्णालयाबाहेर उभ्या असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले.
दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश
या घटनेची दखल घेत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी घेत चौकशीचे आदेश दिले आणि अधिकाऱ्यांना दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, राज्य सरकार या प्रकरणाची सखोल चौकशी करेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच,सरकारी प्रवक्त्याने सांगितले की, धामी यांनी राज्याचे आरोग्य सचिव डॉ आर राजेश कुमार यांना या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे.