लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : पितृपक्ष संपताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने रविवारी २२९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये मध्य प्रदेशातील १४४, छत्तीसगडमधील ३० आणि तेलंगणातील ५५ उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे.
काँग्रेसने छिंदवाडामधून माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना तिकीट दिले आहे. माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांचे पुत्र जयवर्धन सिंह यांना राघौगड मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. कमलनाथ सरकारमध्ये ते मंत्री होते. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना त्यांच्या पारंपरिक मतदारसंघ पाटणमधून, तर उपमुख्यमंत्री टी. एस. सिंहदेव यांना अंबिकापूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. दिल्लीतील अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
काँग्रेसकडून एआयचा वापरछत्तीसगड विधानसभा निवडणुकीमध्ये सरकारच्या कामगिरीवर प्रकाश टाकण्यासाठी आणि विरोधी पक्षांच्या कथित प्रचाराचा मुकाबला करण्यासाठी काँग्रेसची ‘वॉर रूम’ सज्ज आहे. तेथे सोशल मीडिया, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आणि आणि इतर पद्धतींचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येत आहे.
मध्य प्रदेशात ६९ आमदार रिंगणातकाँग्रेसने मध्य प्रदेशमध्ये जाहीर केलेल्या १४४ उमेदवारांच्या पहिल्या यादीत ६९ विद्यमान आमदारांना तिकिटे दिली आहेत. नुकतेच काँग्रेसमध्ये दाखल झालेले भाजपचे माजी खासदार बोधसिंग भगत यांना बालाघाट जिल्ह्यातील कटंगी येथून उमेदवारी देण्यात आली आहे. माजी मंत्री अजय सिंग, रामनिवास रावत, लखन सिंग यादव, हर्ष यादव, मुकेश नायक, कमलेश्वर पटेल, लखा घंघोरियांना उमेदवारी मिळाली.
छत्तीसगडमध्ये नव्या-जुन्यांचा संगमछत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत अनेक जुन्या-जाणत्या नेत्यांवर आशा ठेवत काही नवीन चेहऱ्यांनाही प्रतिनिधित्व दिले आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल, सर्व १२ कॅबिनेट मंत्री, विधानसभा अध्यक्ष चरणदास महंत यांच्यासह २२ विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली. आठ विद्यमान आमदारांचे तिकीट कापले.
शिवराज सिंह करतील ‘हनुमाना’शी दोन हात भोपाळ : आगामी विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या विरोधात काँग्रेसने लोकप्रिय अभिनेते विक्रम मस्ताल यांना उमेदवारी दिली आहे. मस्ताल हे आनंद सागर यांच्या २००८ मध्ये दूरचित्रवाणीवर गाजलेल्या ‘रामायण’ मालिकेतील हनुमानाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहेत. बुधनी मतदारसंघात चौहान यांच्या विरोधात विक्रम मस्ताल यांचा सामना होणार आहे.