नवी दिल्ली - केंद्र सरकाने निश्चित केलेल्या मुदतीआधीच देशातील सर्व गावात वीज पोहोचवल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून केला होता. त्यानंतर केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी एक फोटो ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाचे कौतुक केले होते. मात्र हे ट्विट करताना पियूष गोयल यांनी पोस्ट केलेल्या फोटोवरून नेटीझन्सनी गोयल यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. त्याचे झाले असे की देशातील सर्व भागात वीज पोहोचली हे दाखवण्यासाठी गोयल यांनी दोन फोटो ट्विट केले होते. या फोटोंमधून भारत आधी कसा दिसायचा आणि आता कसा दिसतो, यातील फरक दर्शवण्यात आला होता. तसेच मुदतीआधीच देशातील सर्व गावांमधील वीजजोडणी पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र या फोटोंमुळे प्रत्यक्षात उलटाच परिणाम झाला. नेटिझन्सनी फोटोंमधील चूक पाहून गोयल यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. हे फोटो प्रत्यक्षात दोन वर्षांपूर्वीचे असल्याचे नेटिझन्सनी निदर्शनास आणून दिले. हे फोटो नासाने काढलेले होते. त्यातील एक फोटो हा 2012 सालचा तर दुसरा 2016 सालचा होता. त्या फोटोंवरून गोयल यांनी फसवणूक केल्याचाही आरोप अनेकांनी केला.
मोदींचं कौतुक करणारे ट्विट करताना पियूष गोयल यांच्याकडून झाली मोठी चूक, नेटीझन्सनी उडवली खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2018 3:18 PM