मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार आणि दोन महिलांची विवस्त्रावस्थेत धिंड काढण्यात आल्याची समोर आलेली घटना यामुळे संसदेच्या पावसाठी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आलेले आहेत. दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या संसदीय पक्षाच्या बैठकीला संबोधित केले. तसेच सर्व खासदारांना संसदेच्या कामकाजात सक्रिकय सहभागी होण्याची सूचना दिली. यावेळी राज्यसभेतील सभागृह नेते आणि केंद्रीय मंत्री पीयू। गोयल यांनी भाजपाच्या राज्यसभेतील भाजपाच्या खासदारांना फटकार लगावली.
पीयूष गोयल यांनी भाजपाच्या राज्यसभेतील खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्याबाबत ताकीद दिली. ज्या खासदारांना भोजन करायला जायचं असेल तर त्यांनी विश्रांतीच्या काळात जावं. सभागृह सुरू असताना जाऊ नये. अनुपस्थित राहण्यासाठी कुठलाही बहाणा चालणार नाही. या हंगामात आतापर्यंत सुमारे २३ खासदार वेगवेगळ्या प्रसंगी अनुपस्थित राहिले आहेत.
मणिपूरमधील हिंसाचारावर विरोधी पक्षांकडून मंगळवारीही राज्यसभेमध्ये आक्रमक भूमिका घेण्यात आली. त्याला प्रत्युत्तर म्हणून सरकारने मणिपूरसह राजस्थान, छत्तीसगड या राज्यांमध्ये महिलांविरोधात होत असलेल्या गुन्ह्यांवरही चर्चा झाली पाहिजे, अशी भूमिका घेतली. प्रश्नोत्तराच्या तासावेळी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी मणिपूरमधील परिस्थितीचा उल्लेख करत या संदर्भात सुमारे ५० सदस्यांनी नोटिस दिली आहे. विरोधी पक्ष गेल्या चार दिवसांपासून याबाबत चर्चेची मागणी करत आहेत.
मल्लिकार्जुन खर्गे यांना प्रत्युत्तर देताना सभागृहातील नेते पीयूष गोयल यांनी सांगितले की, कुठल्याही महिलेवर अत्याचार होत असतील तर ते दुर्दैवी आहे. सरकार या विषयाबरोबरच छत्तीसगड, राजस्थान, पश्चिम बंगालसारख्या राज्यांमध्ये महिलांविरोधात होत असलेल्या गुन्ह्यांची चर्चा करू इच्छिते, असे सांगितले. यावेळी पीयूष गोयल यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधताना सांगितले की, सरकार चर्चेसाठी तयार आहे. तसेच गृहमंत्री स्थिती स्पष्ट करतील. मात्र विरोधी पक्ष चर्चा करत नाही आहे. कारण त्यांना आपलं अपयश लपवायचं आहे, असे पीयूष गोयल म्हणाले.