नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारमध्ये कोळसा मंत्री असलेले पीयूष गोयल यांच्या कथित घोटाळ्यावरून निर्माण झालेले वादळ शांत होण्याचे नाव नाही. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी टिष्ट्वट करून गोयल यांच्या राजीनाम्याची मागणी केली. याआधीही काँग्रेस पक्षाकडून गोयल यांच्यावर सतत हल्ले करण्यात आले आहेत.काँग्रेसच्या या टीकेला भाजपानेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधी यांच्या टिष्ट्वटला पीयूष गोयल यांनी टिष्ट्वट करूनच प्रत्युत्तर दिले. ‘२६ मे २०१४ रोजी मंत्री बनण्याआधी मी एक व्यावसायिक चार्टर्ड अकाउंटंट आणि इन्व्हेस्टमेंट बँकर होतो. तुमच्यासारखे कोणतेही काम न करता जीवन जगण्याची कला मी अद्याप तरी शिकलो नाही. मी एक कामदार आहे, नामदार नाही,’ असे गोयल यांनी म्हटले आहे.पीयूष गोयल यांनी आपल्या टिष्ट्वटमध्ये वापरलेले शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकमध्ये केलेल्या भाषणामधून घेतले आहेत. कर्नाटकमधील लढाई ही कामदार विरुद्ध नामदार अशी असल्याचे सांगून मोदी यांनी राहुल गांधी यांना ‘नामदार’ श्रेणीत ठेवले होते. ‘राहुलजी, तुम्ही नामदार आहात तर आम्ही कामदार. आम्ही तुमच्यासमोर बसूच शकत नाही,’ असे मोदी म्हणाले होते.४८ कोटी रुपयांचा घोटाळा हा निश्चितपणे पीयूष गोयल यांच्या हिताशीच संबंधित आहे. कारण त्या वेळी ते ऊर्जामंत्री होते. गोयल यांनी आपले शेअर अशा व्यक्तीला विकले की ज्याची ऊर्जा क्षेत्रात रुची होती आणि या व्यक्तीने कंत्राट घेऊन त्याचा लाभ उचलला, असा स्पष्ट आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.राहुल गांधी यांनी मीडियावरही हल्लाबोल केला. ते म्हणाले, पत्रकारांनी सत्याच्या बाजूने उभे राहायला पाहिजे होते. परंतु ते याबाबत काहीच बोलत नाहीत.गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस पक्ष गोयल यांच्याशी संबंधित या ४७ कोटींच्या घोटाळ्यावर बोलत आहे आणि गोयल त्याला सातत्याने प्रत्युत्तर देत आहेत. मात्र मीडियाने या वाक्युद्धाकडे दुर्लक्ष केल्याने राहुल गांधी यांनी मीडियावर हे ताशेरे ओढले. कर्नाटकमध्ये आयोजित प्रत्येक निवडणूक प्रचार सभेत राहुल गांधी हे गोयल यांच्या कथित घोटाळ्यावर भाष्य करीत आहेत. सोबतच येदियुरप्पा यांच्या घोटाळ्यांचा उल्लेखही ते आपल्या सभेत करताना दिसत आहेत.
गोयल यांच्या राजीनाम्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2018 1:35 AM