Piyush Goyal Narendra Modi : भारत वेगाने पुढे जातोय, पीएम मोदी देशाचे हिरो नंबर वन; पीयूष गोयलांकडून स्तुतीसुमने
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 04:51 PM2023-03-29T16:51:14+5:302023-03-29T16:51:34+5:30
'ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, ते सगळे विरोधक एकत्र येत आहेत.'
नवी दिल्ली: केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी नरेंद्र मोदींचा 'हिरो नंबर वन' असा उल्लेख केला. बुधवारी न्यूज18 नेटवर्कच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी बालपणापासूनच अटल बिहारी वाजपेयी यांच्यापासून प्रेरित असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) नेहमीच प्रभावित केल्याचेही म्हटले.
गोयल पुढे म्हणाले, 'जेव्हा जेव्हा मला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांसोबत बसण्याची संधी मिळते, तेव्हा छान वाटतं. पीएम मोदी देशाचे हिरो नंबर 1 आहेत. त्यांनी देशाला पुढे नेण्याचे काम केले. आज भ्रष्टाचाराविरुद्धचा आमचा लढा कठोर होत आहे. लोकांच्या मनातील राजकारणाची प्रतिमा बदलली आहे.' यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबतही म्हणणे मांडले. ते म्हणाले, 'राहुल गांधींनी ओबीसी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत, त्यांनी माफी मागावी,' असे ते यावेळी म्हणाले.
राहुल गांधींचा बंगला रिकामा करण्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गोयल म्हणाले, 'राहुल गांधींना 30 दिवसांचा वेळ देण्यात आला आहे, पण त्यांनी विनंती केल्यास गृहनिर्माण समिती त्यांना आणखी वेळ देऊ शकते. पण, त्यांच्याकडे दिल्लीत स्वतःची 3-3 घरे आहेत.' केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केल्याच्या विरोधकांच्या आरोपांवर पीयूष गोयल म्हणाले, 'निर्णय तुमच्या बाजूने आला तर यंत्रणा योग्य आणि तुमच्या विरोधात आला तर यंत्रणा अयोग्य, ही विरोधकांची भूमिका आहे,' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
यावेळी त्यांनी विरोधकांच्या एकजुटीवरही टीका केली. 'ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, ते सगळे एकत्र येत आहेत. आजपर्यंत राहुल गांधींना सात प्रकरणात जामीन मिळाला आहे. ते काय आमच्या ताब्यात आहेत का? नॅशनल हेराल्ड प्रकरणात त्यांनी एवढा मोठा घोटाळा केला, पण ते आज जामिनावर बाहेर आहे.' अदानी समूह आणि हिंडेनबर्ग अहवालाबाबत पीयूष गोयल म्हणाले, 'सर्वोच्च न्यायालय आणि सेबीने एक समिती स्थापन केली आहे. सरकारने कोणत्याही कंपनीची बाजू घेतली नसल्याचे सिद्ध झाले आहे. झारखंड, राजस्थानचे टेंडर का दिले तेही त्यांनी सांगावे… त्याचीही चौकशी करा, चुकीचे वाटत असेल तर न्यायालयात जाऊन सिद्ध करा,' असेही ते म्हणाले.