नवी दिल्ली - केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी काँग्रेसवर (Congress) जोरदार हल्लाबोल केला आहे. काही फायद्यासाठी राष्ट्रीय हितसंबंधांशी तडजोड केल्याचा आरोप गोयल यांनी केला. पीयूष गोयल यांनी "काही लोकांच्या राजकीय फायद्यासाठी काँग्रेस राष्ट्रीय हितांशी तडजोड करत आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. भाजपासाठी राष्ट्रीय सुरक्षा सर्वात आधी आहे" असं म्हटलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी ट्विटरद्वारे सतत केंद्र सरकारवर टीका करत असतात. यावरून गोयल यांनी राहुल गांधींवरही निशाणा साधला.
"काँग्रेस पक्ष राहुल गांधींना गांभीर्याने कधीच घेत नाही. आपल्याच सरकारांना काँग्रेस नेतृत्व रोज अस्थिर करत आहे. काँग्रेस नेतृत्व राष्ट्रीय चिंतांपासून तुटले आहे. राजकीय निर्णय घेताना राष्ट्रीय सुरक्षेचा विचार करेल" अशी अपेक्षा पीयूष गोयल यांनी व्यक्त केली आहे. पंजाब काँग्रेसमध्ये जे काही घडतंय त्यावरून मी खूप चिंतेत आहे. कारण राष्ट्रीय सुरक्षा आमच्यासाठी प्रथम आहे. सर्व प्रथम राष्ट्र, नंतर पार्टी आणि शेवटी आपण येतो. आम्ही या तत्त्वावर काम करतो. पंतप्रधान मोदींच सरकार आणि भाजप याच विचाराने काम करतं, असंही गोयल यांनी सांगितलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
"राहुल गांधी स्वत: काँग्रेसला बुडवताहेत"
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पंजाबमधील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "राहुल गांधी स्वत: काँग्रेसला बुडवताहेत" असं म्हणत शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी राहुल (Congress Rahul Gandhi) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. "त्यामुळे ते असेपर्यंत आम्हाला काहीही करण्याची गरज नाही" असं मत चौहान यांनी व्यक्त केलं. तसेच "पंजाबमध्ये चांगले अमरिंदर सिंग मुख्यमंत्री होते, मात्र नवज्योत सिंग सिद्धू यांच्या नादात पंजाबमधील सरकार संपवलं" असं म्हणत सणसणीत टोला लगावला आहे.
"राहुल गांधी असेपर्यंत आम्हाला काही करण्याची गरजच नाही"
चौहान यांच्या या विधानाचा एक व्हिडीओ देखील ट्विटरवर शेअर करण्यात आला असून तो जोरदार व्हायरल होत आहे. शिवराज सिंह चौहान यांनी राहुल गांधींवर टीकास्त्र सोडलं आहे. "सध्या राहुल गांधी स्वतः काँग्रेसला बुडवण्याचं काम करत आहेत. पंजाबमध्ये स्थापन झालेलं सरकार त्यांनी संपवलं. अमरिंदर सिंग चांगले मुख्यमंत्री होते. नवज्योत सिंग सिद्धूच्या नादात अमरिंदर सिंग यांना हटवलं आणि आता सिद्धू पण पळाले. त्यामुळे आता राहुल गांधी असेपर्यंत आम्हाला काही करण्याची गरजच नाही" असं चौहान यांनी म्हटलं आहे.