नवी दिल्ली: ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी ओला, उबरला जबाबदार धरल्यानं दोनच दिवसांपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारमन सोशल मीडियावर ट्रोल झाल्या. यानंतर आता रेल्वे मंत्री पीयूष गोयल नेटकऱ्यांच्या रडारवर आले आहेत. गुरुत्वाकर्षणाचा शोध लावताना आईनस्टाईनला गणिताची मदत झाली नव्हती, असं अजब विधान गोयल यांनी केलं. यानंतर सोशल मीडियानं गोयल यांची चांगलीच खिल्ली उडवली. गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटननं लावला होता. मात्र न्यूटनऐवजी आईनस्टाईनचं नाव घेतल्यानं सोशल मीडियानं गोयल यांना ट्रोल केलं आहे. मोदी-१ मध्ये अर्थ मंत्रालय सांभाळलेल्या आणि सध्या रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी असलेल्या गोयल यांनी काल ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेवरील प्रश्नाला उत्तर दिलं. अर्थव्यवस्थेचा सध्याचा वाढीचा वेग अतिशय कमी आहे. याच गतीनं अर्थव्यवस्था वाढत राहिल्यास ५ ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट कसं गाठणार, असा प्रश्न गोयल यांना विचारण्यात आला होता.
गुरुत्वाकर्षणाचा शोध आईनस्टाईननं लावला; अजब विधानामुळे पीयूष गोयल सोशल मीडियावर ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 8:46 AM