ऑनलाइन लोकमत
चंदीगड, दि. 23 - पंजाबचे मंत्री आणि काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी राज्यातील अग्निशमन दलाच्या स्थितीवर भाष्य करताना पिझ्झा अवघ्या 15 मिनिटांमध्ये येतो मात्र, अग्निशमन दलाचे बंब 5 तास उलटून गेल्यावरही येत नाही असं विधान केलं आहे. स्वपक्षीय आमदार नवतेज सिंग चिमा यांच्या प्रश्नाला उत्तर देताना नवज्योतसिंग सिद्धू यांनी हे विधान केले.
पंजाबच्या विधानसभेत बोलताना नवज्योतसिंग सिद्धू म्हणाले, राज्यासाठी 550 अग्निशमन दलाचे बंब आवश्यक असताना राज्यातील अग्निशमन दलाकडे अवघी 150 वाहने आहेत, यापैकीही 100 वाहने कालबाह्य आहेत. त्यातही केवळ 50 वाहने पूर्णपणे कार्यक्षम असल्याचं ते म्हणाले.
आधीच्या सरकारने अग्निशमन यंत्रणेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले, असं म्हणत आधीच्या शिरोमणी अकाली दल आणि भारतीय जनता पक्षाच्या सरकारवर टीका करायलाही सिद्धू विसरले नाहीत. शिरोमणी अकाली दल आणि भारतीय जनता पक्षाने अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणेच्या खरेदीसाठी केंद्राने दिलेल्या 90 कोटीच्या निधीपैकी केवळ 17 कोटी रुपयांचा वापर खरेदी करण्यासाठी केला असा आरोपही त्यांनी केला.