हरीश गुप्ता ल्ल नवी दिल्लीउत्तर प्रदेश कॅडरचे आयएएस अधिकारी प्रदीपकुमार सिन्हा हे नवे कॅबिनेट सचिव बनतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिन्हा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करीत गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या तर्कवितर्कांना पूर्णविराम दिला आहे. मुख्य दक्षता आयुक्त (सीव्हीसी)आणि मुख्य माहिती आयुक्त (सीआयसी) या दोन पदांवरील नियुक्त्या पुढील आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.अजित सेठ १३ जून रोजी निवृत्त होत असून लवकरच सिन्हा यांना मंत्रिमंडळ सचिवालयात ओएसडी (आॅफिसर आॅन स्पेशल ड्यूटी) म्हणून नवी जबाबदारी स्वीकारावी लागेल. मोदींनी मंत्रिमंडळ सचिवपदासाठी घालून दिलेली लांब प्रक्रिया पार पाडत सिन्हा यांची निवड करण्यात आली आहे. राजस्थानचे मुख्य सचिव राहिलेल्या राजीव महर्षी केंद्रीय यांना खास केंद्रात बोलावत अर्थसचिवपद देण्यात आल्यामुळे तेच या पदाचे दावेदार मानले जात होते. मॅट आणि आयकर अर्जासारख्या बाबी हाताळण्यातील त्रुटी समोर आल्यामुळे त्यांचे नाव मागे पडले. ऊर्जा सचिव असताना सिन्हा यांच्या ऊर्जा क्षेत्रातील कामगिरीची दखल पंतप्रधान मोदींनी घेतली होती. त्यांनी ऊर्जा आणि कोळसामंत्री पीयूष गोयल यांच्यासोबत सिन्हा यांनाही भरीव योगदानाचे श्रेय दिले होते.सिन्हा हे याचवर्षी जुलैमध्ये निवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांना खास आशीर्वाद लाभल्याचे मानले जाते. त्यांना आणखी दोन वर्षांची मुदतवाढ न मिळाल्यास त्यांची कारकीर्द संपुष्टात येईल. अजित सेठ यांची नियुक्ती संपुआ सरकारने केली असली तरी त्यांचे कठोर परिश्रम आणि एकात्मता पाहता मोदींनी त्यांना प्रत्येकी सहा महिन्यांची दोनदा मुदतवाढ दिली होती. आता त्यांची सेवा अन्यत्र घेण्याची शक्यता कमीच आहे. मुख्य दक्षता आयुक्त आणि मुख्य माहिती आयुक्त ही पदेही पुढील आठवड्यात भरली जाणार असून या पदांसाठी ३०० दावेदार समोर आल्याचे पाहता नावांची छाननी करून ती निवड समितीच्या सदस्यांमध्ये वितरित करण्यात आली आहेत. सर्वात मोठ्या विरोधी पक्षाच्या नेत्याचाही या निवड समितीत समावेश आहे.४पी.के. सिन्हा यांचे नाव मंत्रिमंडळ सचिवपदासाठी सर्वात अग्रेसर असल्याचे वृत्त लोकमतने सर्वप्रथम दिले होते. सिन्हा यांच्या नियुक्तीमुळे मोदींनी सर्वच प्रशासकीय पदे भरली आहेत. ही पदे रिक्त असल्यामुळे अनेक अधिकाऱ्यांना मुदतवाढ दिली गेली होती. कालच डीआरडीओ आणि वैज्ञानिक सल्लागारपदी नवी नियुक्ती करण्यात आली.
पी.के. सिन्हा नवे कॅबिनेट सचिव
By admin | Published: May 30, 2015 12:11 AM