नवी दिल्ली :पाकिस्तानात वेगळ्या सिंधूराष्ट्राची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. सिंध प्रांताच्या सान भागात मोठा मोर्चा काढण्यात आला. यामध्ये शेकडो स्थानिक सहभागी झाले होते. या मोर्चात पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्यासह जगभरातील प्रमुख देशांच्या राष्ट्राध्यक्षांचे फलक स्थानिकांनी हाती घेतले होते. पाकिस्तानापासून वेगळे होऊन सिंधूराष्ट्र स्थापन करावे, या प्रमुख मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला होता.
सान शहरात रविवारी प्रचंड मोठा मोर्चा काढण्यात आला. आंतरराष्ट्रीय समुदयाने आमच्या स्वातंत्र्य लढ्यात हस्तक्षेप करावा आणि वेगळा सिंधू देश करावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी मोर्चेकरांनी स्वतंत्र सिंधू राष्ट्राच्या घोषणाही दिल्या. जीएम सैयद यांच्या ११७ व्या जयंतीच्या निमित्ताने हा प्रचंड मोर्चा काढण्यात आल्याचे सांगितले जाते.
जीएम सैयद यांना आधुनिक सिंधी राष्ट्रवादाचे संस्थापक मानले जाते. सिंध, सिंधू खोरे सभ्यता आणि वैदिक धर्माचे पवित्र स्थान आहे. ब्रिटिशांनी या भागावर अवैधरितीने कब्जा केला आणि १९४७ रोजी पाकिस्तानात हा भाग समाविष्ट केला, असा दावा यावेळी मोर्चेकऱ्यांकडून करण्यात आला. सिंध प्रांतात अनेक राष्ट्रवादी पक्ष आहे. या भागात वारंवार वेगळ्या सिंधू राष्ट्राची मागणी केली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून वेगळे सिंधू राष्ट्र व्हावे, यासाठी मोर्चे, आंदोलने केली जात आहेत.
दरम्यान, पाकिस्तानने जम्मू-काश्मीरच्या बळकावलेल्या गिलगिट बाल्टिस्तान या भागातील बलुचिस्तानमध्येही गेल्या अनेक वर्षांपासून स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी होत आहे. स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करणाऱ्यांविरोधात पाकिस्तानी सरकारकडून दडपशाही केली जात असल्याचे अनेकदा समोर आले आहे. भारताकडूनही या दडपशाहीविरोधात संयुक्त राष्ट्रात आवाज उठवला गेला आहे.