ग्वाल्हेर - केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी राणी लक्ष्मीबाई यांच्या समाधीस्थळाला अभिवादन केल्याने काँग्रेस संतप्त झाली आहे. काँग्रेसनेज्योतिरादित्य शिंदेंनी भेट दिलेल्या राणी लक्ष्मीबाई यांच्या समाधीस्थळाला गंगाजल शिंपडून पवित्र केलं आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सिद्धार्थ सिंह राजावत यांनी पोलिसांचे कडे भेदून राणी लक्ष्मीबाईंच्या समाधीवर पुष्पांजली वाहिली.
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी रविवारी शिंदे राजघराण्याचा इतिहास बदलताना राणी लक्ष्मीबाईंच्या समाधीला नमन केले होते. १६० वर्षांमध्ये प्रथमच शिंदे राज कुटुंबातील कुणीतरी लक्ष्मीबाईंना नमन करण्याची ही पहिलीच घटना होती. झाशीची राणी असलेल्या राणी लक्ष्मीबाई ह्या १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धामध्ये इंग्रजांची लढताना १८ जून १८५८ रोजी हुतात्मा झाल्या होत्या. त्यावेळी शिंदे राजघराण्याने त्यांना मदत केली नसल्याचा आरोप इतिहासकारांकडून केला जातो. स्वातंत्र्यानंतरही शिंदे राजघराण्यावर विरोधकांकडून याबाबत आक्षेप घेतला जात होता. मात्र आता ज्योतिरादित्य शिंदेंनी राणी लक्ष्मीबाईंना अभिवादन करत टीकाकारांना उत्तर दिले आहे.
दरम्यान, ज्योतिरादित्य शिंदेंनी राणी लक्ष्मीबाईंच्या समाधीस्थळाला भेट दिल्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्तेही तिथे पोहोचले. काँग्रेसच्या जिल्ह्याध्यक्षा रुची गुप्ता यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे कार्यकर्ते समाधीस्थळाचे शुद्धिकरण करू इच्छित होते. मात्र तेथील पोलीस आणि प्रशासनाने त्यांना रोखले. नंतर रुची गुप्ता यांना समाधीस्थळावर पुष्पांजली वाहण्यासाठी परवानगी देण्यात आली. त्यानंतर गुप्ता यांनी लक्ष्मीबाईंच्या समाधीवर पुष्पांजली वाहून घोषणाबाजी केली. त्यानंतर पोलिसांनी महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना समाधीस्थळावरून बाहेर काढले. अखेरीस रुची गुप्ता यांनी समाधीच्या मुख्य प्रवेशद्वाराचे गंगाजलाने शुद्धीकरण केले. त्यानंतर काही गंगाजल राणी लक्ष्मीबाईंच्या समाधीच्या दिशेनेही शिंपडले.
तर मध्य प्रदेश कांग्रेसचे ज्येष्ठ नेते के. के. मिश्रा यांनी सांगितले की, शिंदे केवळ एवढे काम करून त्यांच्या कुटुंबाच्या इतिहासाचे प्रायश्चित करू शकत नाहीत. शिंदे कुटुंबाने इंग्रजांविरोधात राणी लक्ष्मीबाईंच्या लढ्याला पाठिंबा दिला नव्हता, हा इतिहास आहे. १८५७ मध्ये केलेले पाप २०२१ मध्ये राणी लक्ष्मीबाईंच्या समाधीवर जाऊन धुता येणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.