बंगळुरू : कर्नाटकातील मंदिरे, मशिदी, चर्च; तसेच अन्य प्रार्थनास्थळे ३१ मेनंतर पुन्हा उघडणार असल्याचे त्या राज्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी सांगितले. देशव्यापी लॉकडाऊनचा चौथा टप्पा ३१ मेपर्यंत असून त्यानंतरही तो आणखी वाढविणार की नाही, याबद्दल केंद्र सरकारने अद्याप काहीही सूतोवाच केलेले नाही; मात्र कर्नाटक सरकारने राज्यातील सर्व प्रार्थनास्थळे पुन्हा खुली करण्याचे ठरविले आहे.
हिंदूंच्या धार्मिक व धर्मादाय संस्था या खात्याचे राज्यमंंत्री कोटा श्रीनिवासपुजारी यांनी मंगळवारी सांगितले की, कर्नाटकातील सर्व मंदिरे १ जूनपासून पुन्हा खुली होणार आहेत. मंदिरांमध्ये जाऊन भक्तांना दर्शन घेता येईल. मात्र धार्मिक सोहळे, जत्रा आदी गोष्टींच्या आयोजनास सध्या तरी परवानगी दिली जाणार नाही.
सार्वजनिक वाहतूक, दुकाने उघडणे, लोकांचा संचार यावरील बंधने लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात शिथिल केली आहेत. कर्नाटकामध्येही कोरोना आजाराचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. बंगळुरू शहरामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू नये म्हणून विशेष दक्षता घेण्यात येत आहे. विदेशातून किंवा बाहेरच्या राज्यांतून कर्नाटकमध्ये येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाइनमध्ये राहाणे बंधनकारक करण्यात आले आहे. या राज्यातील स्थलांतरित मजुरांसाठी श्रमिक रेल्वेगाड्या सोडल्या होत्या. परंतु बांधकामे, तसेच अन्य कामे सुरू करण्यास परवानगी दिल्याने मजुरांची आवश्यकता भासणार होती. मजुरांनी कर्नाटक सोडून जाऊ नये म्हणून त्यांची सरकार अडवणूक करत असल्याचेही आरोप झाले होते. (वृत्तसंस्था)
फिजिकल डिस्टन्सिंगचे बंधन कायम
३१ मेनंतर कर्नाटकातील प्रार्थनास्थळे पुन्हा उघडण्यात येणार असली, तरी फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळूनच भक्तांना देवाचे दर्शन घेता येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रार्थनास्थळांत प्रचंड गर्दी होऊन कोरोनाच्या फैलावाला हातभार लागू नये यासाठी कर्नाटक सरकार विशेष दक्षता घेणार असल्याचे समजते.