वॉशिंग्टन- अमेरिकेनं उत्तर कोरियावरील हल्ल्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. त्याप्रमाणेच आण्विक शस्त्रास्त्रांशी लढण्यासाठी अमेरिकेनं एक प्लान आखला आहे. युद्धाची वेळ आल्यास जमिनीवरून आक्रमण करत उत्तर कोरियाला चांगला धडा शिकवण्याचा इरादा अमेरिकेनं केला आहे. परंतु त्याचबरोबर आण्विक शस्त्रास्त्रांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी एक व्यूहरचनाही बनवली आहे, असं वृत्त वॉशिंग्टन पोस्टनं दिलं आहे.युद्धादरम्यान उत्तर कोरिया जैविक किंवा केमिकल शस्त्रास्त्रांचा वापर करू शकतो, याची पूर्वकल्पना अमेरिकेला आहे. सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आशियाच्या दौ-यावर असून, त्यांच्या अजेंड्यावर उत्तर कोरिया हा देश आहे. वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टनुसार, खासदारांना पाठवलेल्या पत्रात पेंटागननं उत्तर कोरियाच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची पूर्ण तयारी केल्याचा उल्लेख आहे.परंतु जर उत्तर कोरियानं आण्विक शस्त्रास्त्रांनी हल्ला केल्यास अमेरिकेची भूमिका काय असेल?, असंही पत्रात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळेच अमेरिका उत्तर कोरियाशी दोन हात करण्यासाठी अंतिम पर्यायांवर विचार करतोय. पेंटागनचे जॉइंट स्टाफ उपसंचालक रिअल अॅडमिरल मायकल जे. ड्युमांट यांनीसुद्धा पत्र लिहिलं आहे. यापूर्वीही दोन्ही हाऊसच्या खासदारांनी उत्तर कोरियासोबतच्या युद्धानं अमेरिकेला किती नुकसान होऊ शकतं, याचीही माहिती मागवली आहे.
उत्तर कोरियावरील हल्ल्यासाठी अमेरिका तयार, आण्विक शस्त्रास्त्रांशी लढण्यासाठी अशी केली व्यूहरचना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2017 5:00 PM