नवी दिल्ली : कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या दोन लसींच्या आपत्कालीन वापराला केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आल्यानंतर आता देशभरात लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात होणार आहे. दररोज सुमारे १३ लाख जणांना लस देण्यात येणार असून, उद्या (शुक्रवार) पुन्हा एकदा देशात कोरोना लसीकरणाचा ड्राय रन घेण्यात येणार आहे, अशी माहिती मिळाली आहे.
सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या दोन लसींना राष्ट्रीय औषध प्राधिकरणाकडून आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या एका वृत्तानुसार, एसबीआय नामक संस्थेने एक अहवाल तयार केला असून, ऑगस्ट २०२१ पर्यंत ३० कोटी देशवासीयांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य केंद्र सरकारकडून निर्धारित करण्यात आले आहे. यानुसार, दररोज सुमारे १३ कोटी २७ लाख नागरिकांना लस दिली जाऊ शकेल.
या अहवालानुसार, लसीचा एक डोस देण्यासाठी सुमारे १०० ते १५० रुपये प्रशासकीय खर्च अपेक्षित आहे. तर लसीची किंमत २५० ते ३०० रुपयांदरम्यान असेल. लसीचे दोन डोस देण्यासाठीचा एकूण खर्च ७०० ते ९०० रुपये असू शकेल, असे नमूद करण्यात आले आहे. एका आढाव्यानुसार, देशात स्थानिक संतुलन राखण्यासाठी दररोज १५ लाख ६४५ जणांना लस देणे गरजेचे आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिदिन लसीकरण केले, तरच देशातील कोरोना नियंत्रणात आणणे शक्य होईल. यामुळे प्रतिदिन किमान १३ लाख जणांचे लसीकरण करण्याची सरकारी योजना आहे, असे या अहवालात म्हटले आहे.
देशभरात मुख्य लसीकरण मोहीम हाती घेण्यापूर्वी उद्या, ८ जानेवारी २०२० रोजी संपूर्ण देशात लसीकरणाचे ड्राय रन म्हणजेच रंगीत तालीम घेण्यात आहे. दरम्यान, यापूर्वी करण्यात आलेल्या ड्रान रनचे गुजरात, पंजाब, आसाम आणि आंध्र प्रदेश या काही राज्यात सकारात्मक परिणाम पाहायला मिळाले. संपूर्ण देशभरात यापूर्वीही कोरोना लसीचे ड्रान रन घेण्यात आले आहे.