भोपाळ:मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर विमानतळावर गेल्या वर्षी झालेल्या विमानअपघात प्रकरणात मध्य प्रदेश सरकारने विमानाच्या वैमानिकाला(पायलट) 85 कोटी रुपयांच्या वसुलीची नोटीस पाठवली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत औषधे आणि इंजेक्शन घेऊन ग्वाल्हेर विमानतळावर उतरत असताना या विमानाचा अपघात झाला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ज्या पायलट कॅप्टन माजिद अख्तर यांना 85 कोटींचे बिल पाठवण्यात आले आहे, त्यांना महामारीच्या काळात प्रशंसनीय कामासाठी कोरोना योद्धा संबोधण्यात आले होते.
मध्य प्रदेश सरकारची मालकी असलेले विमान(B-200GT/VT MPQ) अपघातप्रकरणी मध्यप्रदेश सरकारने विमानाचा पायलट कॅप्टन माजिद अख्तर यांच्यावर आरोप निश्चित केले आहेत. या अपघातासाठी त्यांना दोषी मानून सरकारने 85 कोटींच्या वसुलीची नोटीसही दिली आहे. आता माजिद यांच्याकडून या नोटीशीला उत्तर आल्यानंतर सरकार वसुलीचा निर्णय घेणार आहे. दरम्यान, अपघातानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने ऑगस्ट 2021 मध्येच पायलट माजिद अख्तरचा परवाना रद्द केला होता.
नोटीसमध्ये काय आहे?
पायलटला दिलेल्या नोटीसमध्ये सरकारने म्हटले की, विमानाच्या अपघातानंतर दुरुस्तीसाठी आतापर्यंत सुमारे 23 कोटी रुपये खर्च झाले आहेत. विमानाची खरेदी किंमत आणि खर्चासह सरकारचे 85 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या निष्काळजीपणामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तुमच्याकडून का करू नये? असे आरोपपत्रात म्हटले आहे.
काय आहे प्रकरण?
मध्यप्रदेश सरकारचे हे विमान 7 मे 2021 रोजी गुजरातमधून कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी रेमडेसिव्हिर इंजेक्शनसह औषधांचे सुमारे 71 बॉक्स घेऊन परतत होते. ग्वाल्हेर विमानतळावर उतरताना विमानाचा अपघात झाला. लँडिंगच्या वेळी विमान धावपट्टीच्या जवळपास 300 फूट आधीच कोसळले. यामुळे विमानाच्या कॉकपिटचा पुढचा भाग, प्रोपेलर ब्लेडचे मोठे नुकसान झाले.