कर्नाटकी नाट्यामागं भाजपा? काँग्रेस आमदारांचा भाजपा खासदाराच्या विमानातून प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2019 09:52 AM2019-07-08T09:52:55+5:302019-07-08T09:59:40+5:30
भाजपा कर्नाटक सरकार अस्थिर करत असल्याचा काँग्रेसचा आरोप
मुंबई: अस्तित्वापासून अस्थिर असलेलं कर्नाटक सरकार पुन्हा एकदा संकटात सापडलं आहे. काँग्रेस, जेडीएसच्या 10 आमदारांनी राजीनामा देऊन मुंबई गाठली आहे. विशेष म्हणजे भाजपा खासदार राजीव चंद्रशेखर यांच्याशी संबंधित कंपनीच्या विमानानं हे आमदार मुंबईत दाखल झाले.
काँग्रेस, जेडीएसच्या 10 आमदारांनी शनिवारी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर लगेचच हे आमदार बंगळुरुहून मुंबईला रवाना झाले. ज्युपिटर कॅपिटेल लिमिटेड कंपनीच्या विमानानं त्यांनी मुंबई गाठली. भाजपा खासदार चंद्रशेखर या कंपनीचे संस्थापक आहेत. सध्या या कंपनीचं चेअरमनपददेखील त्यांच्याकडेच आहे. काँग्रेस, जेडीएसचे आमदार ज्युपिटर कॅपिटलच्या विमानानं मुंबईला गेल्याच्या माहितीला कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला. आम्ही व्यवसाय करतो. त्यामुळे ज्याला सेवा हवी असते, त्याला सेवा दिली जाते, असं कंपनीकडून सांगण्यात आलं. मात्र आमदारांसाठी कोणी विमान बूक केलं याची माहिती देण्यास कंपनीनं नकार दिला.
भाजपाकडून कर्नाटक सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धारमय्या, माजी केंद्रीय मंत्री मल्लिकार्जुन खर्गे आणि कर्नाटक सरकारमधील मंत्री डी. के. शिवकुमार यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. मात्र भाजपानं हे आरोप फेटाळले आहेत. काँग्रेस, जेडीएसच्या आमदारांच्या राजीनाम्यामागे भाजपाचा हात नसून तो सत्ताधारी पक्षांचा अंतर्गत प्रश्न असल्याचं भाजपानं स्पष्ट केलं आहे. राज्यपालांनी सूचना केल्यास बहुमत सिद्ध करू, असा विश्वास विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपानं व्यक्त केला आहे.