नवी दिल्ली - कुवैत-गोवा प्रवासादरम्यान विमान अचानक १० हजार फूट खाली आणणाऱ्या एअर इंडियाच्या वैमानिकाची उड्डयन सुरक्षा विभागाने कसून चौकशी सुरू केली आहे. ही घटना १५ सप्टेंबरची असून ए-३२० बनावटीचे हे विमान कुवैतवरुन गोव्याला जात होते.विमानसेवेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पायलटने ‘हॉट ब्रेक’च्या इशाºयानंतर विमान ३५ हजारावरून २५ हजार फूट खाली आणले होते. ब्रेक थंड करण्यासाठी विमान खाली आणण्यात आले, असे सूत्रांचे मत आहे. ३५ हजार फुटांवर तापमान फार कमी असते. अशावेळी हा इशारा योग्य नसावा. काही वेळेतच विमान पुन्हा ३५ हजार फूट उंचीवर चढविण्यात आले. घटनेसंदर्भात जाणून घेण्यासाठी सुरक्षा विभागाने वैमानिकाला १ आॅक्टोबर रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. वैमानिकाने स्वत: एअर इंडियाला घटनेची माहिती दिली होती. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने तपास पूर्ण होईपर्यंत यावर भाष्य करण्यास नकार दिला आहे. (वृत्तसंस्था)
विमान अचानक १० हजार फूट खाली आणले, एअर इंडियाच्या वैमानिकाची कसून चौकशी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 3:24 AM