लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: प्रवासी विमानांना धमक्या देण्याचे सत्र थांबत नसल्याचे विमान कंपन्या व प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण तयार झालेले असतानाच गुरुवारी आणखी ८५ विमानांना बॉम्बची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली. एअर इंडिया, इंडिगो व विस्तारा कंपनीच्या प्रत्येकी २० विमानांना, तर आकासा कंपनीच्या २५ विमानांना धमक्या मिळाल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. गेल्या दहा दिवसांपासून विमानांना धमक्या मिळण्याचे सत्र सुरू असल्याने २५५ हून अधिक विमानांच्या उड्डाणावर विपरीत परिणाम झाला आहे. सततच्या धमक्यांमुळे विमान वाहतूक क्षेत्राचे ६०० कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे.
आमच्या काही विमानांना सुरक्षेसंदर्भात इशारा मिळाल्याचा दावा आकासाने केला आहे. त्यामुळे विमान कंपनीच्या प्रतिसाद विभागाचे कर्मचारी स्थानिक प्राधिकरणांसह सुरक्षा आणि सुरक्षा शिष्टाचाराचे पालन करत असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.
विमाने हाय अलर्टवर
गोव्यातील विमानतळावर उतरणाऱ्या चार विमानांना बॉम्बची धमकी मिळाली. यानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून गुरुवारी गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ, डाबोलिम व मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ या दोन्ही विमानतळांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले. धमकी मिळाल्याबरोबर दोन्ही विमानतळावर बॉम्ब धमकी मूल्यांकन समिती (बीटीएससी) स्थापन करण्यात आली. यापूर्वी मंगळवारी ५० पेक्षा अधिक विमानांना धमकी मिळाली होती. एअर इंडिया व इंडिगो कंपनीच्या प्रत्येकी १३, तर आकासा विमान कंपनीच्या १२ विमानांना धमकी मिळाली होती.
सरकार कठोर नियम लागू करणार
विमानांना वारंवार मिळणाऱ्या बॉम्बच्या धमक्यांवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकार कठोर नियम लागू करण्याचा विचार करत आहे. धमक्या देऊन वाहतुकीत अडथळा निर्माण करणाऱ्या उपद्रवी लोकांना ‘नो-फ्लाय’ यादीत टाकता येईल का, या अनुषंगानेदेखील विचार सुरू आहे. उपद्रवी लोकांची ओळख पटवून त्यांना विमानात प्रवेश करण्यावर निर्बंध घालणे हा ‘नो-फ्लाय’ यादीचा उद्देश असल्याचे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने म्हटले आहे.
धमक्यांमुळे केंद्र सरकार ‘ॲक्शन मोड’वर
- विमानांना मिळणाऱ्या बॉम्बच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने बुधवारी एक्स, मेटा या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स व विमान कंपन्यांसोबत व्हर्च्युअल बैठक घेतली.
- बॉम्बच्या धमकीसंदर्भातील धोकादायक अफवा पसरू नये, यासाठी काय उपाययोजना केल्या यासंदर्भात मंत्रालयाने त्यांना विचारणा केली.
- तुम्ही गुन्ह्याला प्रोत्साहन देत होता, हे परिस्थितीवरून स्पष्ट होत असल्याचे नमूद करत मंत्रालयाने एक्स, मेटा या सोशल मीडियांची चांगलीच कानउघाडणी केली.
१४ ऑक्टोबरपासून रोज धमक्या
- या महिन्यात १४ ऑक्टोबरपासून विमान कंपन्यांना बॉम्बची धमकी मिळण्याची मालिका सुरू झाली.
- त्यानंतर सातत्याने इंडिगो, एअर इंडिया, विस्तारा व आकासा विमान कंपन्यांच्या फ्लाइट्सना बॉम्बच्या धमक्या येत आहेत.
- १४ ऑक्टोबरपासून २३ ऑक्टोबरपर्यंत लागोपाठ विमान कंपन्यांना बॉम्बच्या धमक्या मिळत आहेत.
काय केल्या उपाययोजना?
सतत धमक्या मिळत असल्याने केंद्र सरकारने १६ ऑक्टोबर रोजी एअर मार्शलची संख्या दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. याच दिवशी गृह मंत्रालयाने खोट्या धमक्यांसंदर्भात हवाई वाहतूक मंत्रालयाकडे अहवाल मागितला.१९ ऑक्टोबर रोजी केंद्र सरकार व विमान कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बैठक घेत बॉम्बच्या धमक्यांवर तोडगा काढण्यासाठी चर्चा केली.