केंब्रिज (ब्रिटन) : भारतातील लोकांना बोलण्याचे स्वातंत्र्य देणाऱ्या संस्थांवर सुनियोजित हल्ला होत आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी येथे केला. केंब्रिज विद्यापीठाच्या कॉर्पस क्रिस्टी कॉलेजमध्ये आयोजित इंडिया ॲट ७५ या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी राहुल गांधी यांनी विद्यार्थी आणि विशेषत: मूळ भारतीय विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. हिंदू राष्ट्रवाद, काँग्रेस पक्षात गांधी कुटुंबाची भूमिका आणि देशातील लोकांना एकत्रित करण्याचे प्रयत्न या विषयावर त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, आमच्यासाठी भारत तेव्हा जिवंत होतो, जेव्हा भारत बोलत असतो. जेव्हा हा देश गप्प होतो, तेव्हा तो नीरस होतो. संसद, निवडणूक प्रणाली, लोकशाहीची पायाभूत रचना यावर एका संघटनेकडून ताबा मिळविला जात आहे. या मुद्द्यावरुन राहुल गांधी यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्यावर टीकाही केली. (वृत्तसंस्था)
तो धडा देणारा मोठा अनुभव तीन दशकांपूर्वी वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा एका हल्ल्यात मृत्यू झाला. माझ्यासाठी धडा देणारा जीवनातील हा सर्वात मोठा अनुभव होता, असेही राहुल गांधी म्हणाले. या घटनेनंतर मला ज्या गोष्टी शिकायला मिळाल्या, त्या बहुधा मी कधीच शिकू शकलो नसतो. एक मुलगा म्हणून मी वडिलांना गमावलो होतो, हे खूपच दु:खद होते.