नवी दिल्ली - इस्रोचा विक्रम लँडरशी असलेला संपर्क तुटल्याने चांद्रयान-2 मोहिमेला धक्का बसला. जवळपास संपूर्ण मोहीम अगदी सुरळीत सुरू असताना अखेरच्या दोन मिनिटांमध्ये इस्रोच्या हाती निराशा आली. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश होण्याची संधी भारतासमोर होती. मात्र या यशाने इस्रोला थोडक्यात हुलकावणी दिली. यानंतरही इस्रोची महत्त्वाकांक्षी चांद्रयान मोहीम 98 टक्के यशस्वी झाली आहे. चांद्रयान-2 मोहीमेने 98 टक्के यश मिळविल्याचे सांगतानाच गगनयान हे पुढचे ध्येय आहे, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी याआधी दिली आहे. भारतीयांसाठी आता एक आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. मार्स ऑर्बिटर मिशनला (MOM) पाच वर्षे पूर्ण झाली आहेत.
मार्स ऑर्बिटर मिशन म्हणजेच मंगळयान हे केवळ 6 महिन्यांसाठी पाठवण्यात आले होते. मात्र गेल्या पाच वर्षांपासून ते उत्तम काम करत आहे. 5 नोव्हेंबर 2013 रोजी भारताने हे मंगळयान पाठवलं होतं. 11 महिन्यांनी हे यान मंगळाच्या कक्षेत पोहचलं होतं. फक्त 6 महिन्यांसाठी मंगळयान मंगळाच्या कक्षेत पाठवण्यात आलं होतं. मात्र मॉमने कधीच निराश केलं नाही. मार्स ऑर्बिटर मिशन सुरू असून इस्रोकडे मंगळाची माहिती पाठवत आहे.
24 सप्टेंबर 2014 रोजी मंगळयान मंगळाच्या कक्षेत पोहचलं होतं. तेव्हापासून ते सातत्याने काम करत आहे. आता त्याला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. मंगळयानाने आतापर्यंत एक हजारपेक्षा जास्त फोटो पाठवले आहेत. तसेच पाच वर्षात मंगळयानाकडून इस्रोच्या डेटा सेंटरला 5 टीबीपेक्षा जास्त डेटा मिळाला आहे. शास्त्रज्ञ मंगळाच्या अभ्यासासाठी याचा वापर करत आहेत. जगातील सर्वात कमी खर्चात हे मोहीम आखण्यात आली होती. यासाठी 450 कोटी रुपयांचा खर्च आला आहे.
मंगळयान मंगळापासून किमान 421.7 किलोमीटर ते कमाल 76,993 किलोमीटरवरून फेरी मारत आहे. मंगळ ग्रहावर असलेल्या ओलिंपिस मॉन्स नावाच्या ज्वालामुखीचा फोटो मंगळयानाने घेतला होता. हा ज्वालामुखी आपल्या सौरमंडळात असलेल्या कोणत्याही पर्वतापेक्षा मोठा आहे. तसेच मॉमने पाठवलेल्या फोटोंवरून मंगळावर बर्फच बर्फ असल्याचे दिसते. सातत्याने बर्फवृष्टी कमी जास्त होत असते. चंद्राचा जास्तीजास्त 9 लाख 52 हजार 700 किमी ते किमान 6 लाख 33 हजार 825 किमी भाग बर्फाच्छादित असतो. मंगळयानाने मंगळावरील वेलेस मेरिनेरिसचे फोटो देखील घेतले आहेत.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) गगनयान प्रकल्पासाठी डिसेंबर 2020 मध्ये पहिली फ्लाईट सोडणार आहे. यानंतर जुलै 2021 मध्ये दुसरे मानवरहित फ्लाईट अंतराळात पाठविणार असल्याची घोषणा इस्रोचे प्रमुख सिवन यांनी सांगितले आहे. तसेच डिसेंबर 2021 मध्ये तिसरी फ्लाईट पाठविणार असून यातून पहिल्यांदाच भारतीय अंतराळवारी करणार आहेत. गगनयान भारतासाठी महत्त्वाचा प्रकल्प आहे. ही मोहीम देशाची विज्ञान आणि प्रौद्योगिक क्षमतेला वाढविणार आहे. सिवन यांनी चांद्रयान-2 ची माहिती देताना इस्रोचे पुढील उद्दीष्ट गगनयान असल्याचे स्पष्ट केले होते.