हरीश गुप्ता - नवी दिल्ली
नियोजन आयोग येत्या दोन आठवडय़ांत पुरुज्जीवित केला जाणार असून, वाजपेयी सरकारच्या काळात ऊर्जामंत्री राहिलेल्या सुरेश प्रभू यांचे नाव उपाध्यक्षपदासाठी आघाडीवर आहे. प्रभू हे सुधारणावादी राजकारणी म्हणून ओळखले जातात. एकेकाळी मुंबईच्या राजकारणावर त्यांचा प्रभाव राहिला आहे.
प्रभू हे सध्या सरकारच्या कोळसा खाण लिलाव आणि पायाभूत क्षेत्रच्या कार्यपद्धतीसंबंधी सल्लागार परिषदेचे अध्यक्ष आहेत. गेल्या काही महिन्यांपासून योजना आयोगाचे काम ठप्प असून, त्याच्या पुनर्रचनेची चर्चा वेळोवेळी होत राहिली आहे. माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा, अरुण शौरी यांची नावेही चर्चेत होती. पुत्र जयंत सिन्हा यांना येत्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्यामुळे यशवंत सिन्हा यांना हे पद दिले जाणार नसल्याचे स्पष्ट होताच प्रभू यांचे नाव शर्यतीत पहिल्या स्थानी आले. पंतप्रधान कार्यालयाला माजी दूरसंचार मंत्री अरुण शौरी यांचे नाव या पदासाठी फारसे अनुकूल वाटले नाही. प्रभू हे लो-प्रोफाईल राहिले असले तरी मेहनती आणि प्रामाणिक अशी त्यांची प्रतिमा पंतप्रधानांना भावली. नियोजन आयोगाने केंद्र व राज्यांमध्ये नियमित दुवा साधण्याची भूमिका बजावावी. विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत करीत निर्णय घेतले जावे, आर्थिक बाबींसंबंधी आंतरराज्य परिषदेची भूमिका आयोगाकडे सोपविली जावी, असे मोदींना वाटते.
4गेल्या सहा महिन्यांपासून नियोजन आयोगाची पुनर्रचना प्रलंबित असून, पंतप्रधान 12 नोव्हेंबर रोजी म्यानमार, ऑस्ट्रेलिया आणि फिजीला रवाना होण्यापूर्वी ही प्रक्रिया पार पाडली जाईल, असे सूत्रंनी सांगितले.
4प्रभू हे वाणिज्य स्नातक आणि सीए आहेत. रा.स्व.संघाची संस्था राहिलेल्या ‘इंडिया फाऊंडेशन’ मध्येही त्यांचा सहभाग राहिला आहे. भाजपचे सरचिटणीस राम माधव यांचाही या फाऊंडेशनशी संबंध आहे.