नवी दिल्ली : कोरोना रुग्णासाठी प्लाज्मा केवळ प्रयोग आहे; उपचाराची पद्धत नाही. भारतात प्लाज्मा थेरपीला त्यामुळे कोरोना रुग्णांवर सरसकट उपचारासाठी मान्यता नाही. रुग्णांच्या जीवास त्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो, अशा स्पष्ट शब्दांत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्लाज्मा उपचारांना नकार दिला. महाराष्ट्र व दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने स्थानिक आरोग्य प्रशासनाने प्लाज्मा उपचाराचा वापर करण्याची चाचपणी सुरू केली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बऱ्या झालेल्या रुग्णांना प्लाज्मा दान करण्याचे आवाहन केले. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी स्पष्टीकरण दिले.अगरवाल म्हणाले, प्लाज्मा उपचार पद्धतीला मान्यता नाही. केवळ प्रायोगिक तत्त्वावर काही देशांमध्ये तिचा वापर केला गेला. भारतातही प्रयोगच सुरू आहेत. आयसीएमआरचे संशोधन सुरू आहे. काही कोरोना रुग्णांसाठी प्लाज्मा जीवघेणा ठरू शकतो. ठोस निष्कर्ष निघत नाही तोपर्यंत प्लाज्माकडे प्रयोग म्हणूनच पाहा.जागतिक आरोग्य संघटनेने सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या २० देशांची यादी जाहीर केली. त्यांची एकत्र लोकसंख्या भारताइतकीच आहे. भारताच्या तुलनेत या देशांमध्ये ८४ टक्के जास्त रुग्ण तर २०० टक्के जास्त मृत्यूदर असल्याचे अगरवाल म्हणाले.>प्लाज्मा उपचार पद्धतीला मान्यता नाही. केवळ प्रायोगिक तत्त्वावर काही देशांमध्ये तिचा वापर केला गेला. भारतातही प्रयोगच सुरू आहे. आयसीएमआरचे संशोधन सुरू आहे. काही कोरोना रुग्णांसाठी प्लाज्मा थेरपी जीवघेणी ठरू शकते. ठोस निष्कर्ष निघत नाही तोपर्यंत याकडे प्रयोग म्हणूनच पाहा, उपचार म्हणून नाही. उपचार म्हणून हा प्रयोग करणे अवैध आहे.- लव अगरवाल, संयुक्त सचिव, आरोग्य मंत्रालय
CoronaVirus: प्लाज्मा थेरपी केवळ प्रयोग; उपचारासाठी मान्य नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 6:02 AM