नवी दिल्ली - लहान मुलांकडे नीट लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. कधी कधी त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं मुलांसाठी घातक ठरू शकतं. अशीच एक घटना झारखंडमध्ये घडली आहे. पलामू जिल्ह्यातील हुसेनाबाद स्थित घोडबंधा गावात ही धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 6 महिन्यांच्या बाळाने प्लास्टिकचा बल्ब गिळला. यामुळे चिमुकलीच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, घोडबंधा निवासी सतेंद्र राम यांची सहा महिन्यांची मुलगी प्रिया कुमारीने खेळत असताना तिने दोन इंच प्लास्टिकचा बल्ब चुकून गिळला. जो तिच्या गळ्यात जाऊन अडकला.
गळ्यात प्लास्टिकचा बल्ब अडकल्यामुळे मुलीला खूप त्रास होऊ लागला. यानंतर कुटुंबीयांनी तिला तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीने खेळता खेळता प्लास्टिकचा बल्ब तोंडात घातला, बल्ब तिच्या गळ्यात अडकल्यानंतर ती जोरजोरात रडू लागली. सुरुवातीला कुटुंबीय स्वत:च मुलीच्या तोंडात अडकलेला बल्ब काढण्याचा प्रयत्न करीत होते, मात्र कोणालाही ते जमलं नाही. मुलीच्या जीवाला धोका असल्याचं पाहत त्यांनी मुलीला रुग्णालयात दाखल केलं
मुलीच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांचे मानले आभार
डॉक्टरांच्या टीमने अथक प्रयत्न करून चिमुकलीच्या गळ्यात अडकलेला दोन इंचाचा बल्ब बाहेर काढला. आता मुलीची प्रकृती स्थिर आहे. जेव्हा डॉक्टरांनी मुलीच्या गळ्यातून प्लास्टिकचा बल्ब काढला तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटलं. मुलीच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांचे आभार मानले आहेत. तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमुळेच मुलीचा जीव वाचल्याचं देखील म्हटलं आहे. घरातील लहान मुलांकडे दुर्लक्ष करणं अनेकदा महागात पडू शकतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.