नवी दिल्ली : श्रमिक स्पेशल ट्रेनने घरी पोहोचण्याच्या आनंदातच, आपल्या बोगीत एखाद्या जन्माला आलेल्या बाळाचा रडण्याचा आवाज आला तर आनंद द्विगुणित झाल्या शिवाय रहात नाही. एक मेपासून आतापर्यंत श्रमिक स्पेशल ट्रेनमध्ये प्रवाशांना, अशा आनंदाची अनुभूती तब्बल 37 वेळा आली. पीटीआय या वृत्त संस्थेने रेल्वेच्या हवाल्याने यासंदर्भात वृत्त दिले आहे. विशेष म्हणजे या रेल्वेगाड्यांमध्ये जन्माला आलेल्या बाळांची नावंही, त्यांच्या पालकांनी कोरोना संकटात आलेल्या नवीन नावांवरच ठेवली आहेत.
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या रेल्वे प्रवासातच आई झालेल्या ईश्वरी देवी यांनी त्यांच्या मुलीचे नाव करुणा ठेवले आहे. तर रीना यांनी आपल्या मुलाचे नाव लॉकडाउन यादव, असे ठेवले आहे. या दोन्ही बाळांचा जन्म श्रमिक स्पेशल ट्रेनमध्येच प्रवासादरम्यान झाला आहे. कोरोना व्हायरसने संपूर्ण मानवी जीवनावरच प्रभाव टाकला आहे. त्यापासून मुलांची नावंही सुटलेली नाहीत.
करुणाचे वडील राजेंद्र यादव यांना विचारण्यात आले, की त्यांच्या मुलीच्या नावाशी कोरोनाचा काय संबंध आहे? यावर ते म्हणाले, दया आणि सेवा भाव. छत्तीसगमधील धरमपूर येथील राजेंद्र यादव म्हणाले, लोकांनी त्यांना त्यांच्या मुलीचे नाव कोरोनावर ठेवायला सांगितले होते. पण, या आजाराने लाखो लोकांचे जीवन उद्धवस्त केले. असे असताना मी माझ्या मुलीचे नाव कोरोना कसे ठेवणार?
CoronaVirus News: आश्चर्य! कोरोना व्हायरस अँटीबॉडीजसह बाळाचा जन्म, डॉक्टर हैराण; रुग्णालय म्हणते...
श्रमिक स्पेशल ट्रेनने मुंबईहून यूपीला जात असलेल्या रीना यांनी आपल्या मुलाचे नाव लॉकडाउन यादव ठेवले आहे. त्या म्हणाल्या हा कठीन काळ नेहमीच स्मरणात रहावा, म्हणून आम्ही आमच्या मुलाचे नाव, असे ठेवले आहे.
आता या 'स्वस्त' औषधाने होणार कोरोनाचा 'मस्त' इलाज? गोळीची किंमत फक्त 1 रुपया
ममता यादव याही अशाच महिलांपैकी एक आहेत. ज्यांनी या कठीन परिस्थितीत बाळाला जन्म दिला. ममता 8 मेरोजी जामनगर-मुजफ्फरपूर श्रमिक स्पेशल ट्रेनमध्ये बसल्या होत्या. त्यांनीही या ट्रेनमध्येच बाळाला जन्म दिला. त्या बिहारच्या छपरा जिल्ह्यातील आहेत.