ऑनलाइन लोकमत
कासगंज (उत्तरप्रदेश), दि. २४ - रेल्वे प्रवासादरम्यान २०० रुपयांची लाच दिली नाही म्हणून रेल्वे पोलिसांनी तलवारबाजीतील राष्ट्रीय खेळाडूला धावत्या ट्रेनमधून बाहेर फेकल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत त्या खेळाडूचा मृत्यू झाला असून रेल्वे पोलिसांनी मात्र खेळाडूच्या कुटुंबीयांनी केलेले आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे.
उत्तरप्रदेशमधील कासगंज येथे तलवारबाजीतील राष्ट्रीय खेळाडू होशियार सिंह हे त्यांच्या पत्नी व आईसोबत कासगंज - मथुरा पॅसेंजर ट्रेनमधून प्रवास करत होते. होशियार यांची आई व पत्नी महिला डब्यातून प्रवास करत होते तर होशियार हे दुस-या डब्यात होते. मात्र प्रवासादरम्यान पत्नीची प्रकृती खालावल्याने होशियार सिंह हे महिला डब्यात आले. महिला डब्यातील रेल्वे पोलिसांनी होशियार सिंह यांना अडवले व महिला डब्यातून प्रवास करायचा असेल तर २०० रुपये देण्याची मागणी केली. होशियार सिंह यांनी पोलिसांना परिस्थितीची माहितीही दिली पण पोलिसांनी पैशाचा तगादा लावला. अखेरीस हे प्रकरण बाचाबाचीपर्यंत गेले व पोलिसांनी धक्का मारुन होशियार सिंहला ट्रेनबाहेर फेकून दिले असा आरोप होशियार सिंह यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी कासगंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. होशियार सिंह यांनी २००५ मध्ये तलवारबाजीत १७ वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक पटकावले होते.