ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. ५ - नोकरीच्या शोधात असणा-या अनेकांना आरामदायी, सुखासीन, सुरक्षित नोकरी मिळावी अशी इच्छा असते. नोकरीची प्रत्येकाची जी कल्पना असते त्यामध्ये स्मशानातील नोकरी कोणलाही आवडणार नाही. महिला तर, अशा ठिकाणी नोकरीची कल्पनाही करणार नाहीत.
पण चेन्नईतील एक ३४ वर्षीय हिंदू महिला मागच्या अडीचवर्षापासून शहरातील सर्वात जुने वलानकाडू स्माशनभूमी संभाळत आहेत. प्रवीणा सोलेमॅन असे या महिलेचे नाव आहे. दोन मुलांची आई असणा-या प्रवीणाने मद्रास विद्यापीठातून इंग्लिश लिटरेचर विषयातून पदवी मिळवली आहे. अडीचवर्षांपूर्वी प्रवीणाने वलानकाडू स्मशानभूमीची जबाबदारी घेतली.
आता तिथे ती मुख्य प्रशासक आहे. कुठलाही मृतदेह अंत्यसंस्कारासाठी सरणावर ठेवण्यापूर्वी प्रवीणा स्वत: जातीने सर्व व्यवस्था तपासून घेतात. प्रवीणाने सुरुवातीला हे काम स्वीकारले तेव्हा ते अनेकांना पचनी पडले नव्हते. काही जण चिडवायचे, शेरेबाजी करायचे, सुरुवातीचे दिवस खूप त्रासदायक होते असे प्रवीणाने सांगितले.
ज्यांची या स्मशानभूमीवर उपजिविका अवलंबून होती त्यांनी नोकरी जाईल या भितीने आम्हाला अंगावर अॅसिड टाकण्याची धमकी दिली. पहिले तीन महिने खूप कठिण होते. हळहळू त्या लोकांना आमच्यामुळे त्यांच्या नोक-या अडचणीत येणार नाहीत असा विश्वास बसला त्यानंतर सर्व काही सुरळीत झाले असे प्रवीणाने सांगितले.
प्रवीणा बारावर्षापासून ज्या एनजीओ बरोबर काम करत होती. त्या एनजीओला वलकानाडू स्मशानभूमी संभाळण्याचे कंत्राट मिळाले. ही स्मशानभूमीची जाग दुर्लक्षित होती. रात्री इथे दारु पिण्यासाठी लोक जमायचे. त्यामुळे पहिली इथली परिस्थिती बदलण्यावर ही जागा सुरक्षित करण्यावर भर दिला. प्रवीणासह दोन महिला स्वयंसेविका इथे काम करु लागल्या.
प्रवीणाने जेव्हा करीयर म्हणून ही अनपेक्षित वाट निवडली तेव्हा तिला पतीसह संपूर्ण कुटुंबाने साथ दिली. स्मशानभूमीमध्ये सुधारणा केल्यानंतर लोकांचा दृष्टीकोन आता बदलला आहे.