मुंबई : लोकसभा निवडणुकीत प्रत्येकाने मतदान करण्याची महत्त्वाची भूमिका बजावावी, असे आवाहन करणाऱ्या उद्घोषणा रेल्वे स्थानकांमधून झाल्यानंतर आता अशाच प्रकारे आवाहन यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या काळातही स्थानकांवर होणार आहेत. या आणि अनेक विषयांसदर्भात निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि पश्चिम तसेच मध्य रेल्वे प्रशासन यांच्यात गुरुवारी बैठक झाली. त्या वेळी उद्घोषणेद्वारे मतदान करण्याचे आवाहन, निवडणुकीत रेल्वे कर्मचाऱ्यांचा आणि रेल्वे पोलिसांचा सहभाग यावर चर्चा करण्यात आली. लोकसभा असो वा विधानसभा प्रत्येक निवडणुकीत मतदान कमी होते. त्यामुळे जास्तीत जास्त मतदान व्हावे या उद्देशाने निवडणूक आयोगाकडून अनेक योजना केल्या जात आहेत. होर्डिंग्ज, बॅनर्स तसेच टीव्हीवरील जाहिरातीतून वेगवेगळ्या प्रकारे आवाहन करताना त्यातून मतदानाचे महत्त्व पटवून दिले जाते. त्याच प्रकारे सोशल नेटवर्किंगचाही यात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. महत्त्वाची बाब म्हणजे मतदानाचे महत्त्व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी रेल्वे स्थानकांचाही वापर केला जात आहे. मुंबई शहर आणि उपनगरातून धावणाऱ्या रेल्वेमधून जवळपास ७५ लाख प्रवासी प्रवास करतात. लोकसभा निवडणुकीत प्रत्येक स्थानकावर उद्घोषणेद्वारे आवाहन करण्यात आले होते. हाच फॉर्म्युला यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही वापरण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. गुरुवारी निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि रेल्वे प्रशासन यांच्यात झालेल्या बैठकीत प्रत्येक स्थानकावर उद्घोषणेद्वारे मतदान करण्याचे आवाहन प्रवाशांना करण्यावर विचार करण्यात आला.अशा प्रकारच्या उद्घोषणा स्थानकांवर केल्या जाणार आहेत. मात्र त्याची तारीख अद्याप निश्चित नसून त्यावर नंतर निर्णय होणार असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शरत चंद्रायन यांनी सांगितले. तर यावर चर्चा झाली असून मतदान करण्याची एक ध्वनिफीत रेल्वेला दिली जाईल आणि त्यानंतर त्याची सुरुवात केली जाईल, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील म्हणाले. (प्रतिनिधी)
कृपया ध्यान दे, मतदान जरुरी है
By admin | Published: September 26, 2014 1:59 AM