नवी दिल्ली/ पाटणा : राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबाशी कथित संबंधित आयआरसीटीसी हॉटेलवाटप घोटाळ्यात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पाटण्यामध्ये ४५ कोटी रुपये मूल्य असलेली तीन एकर जमीन जप्त केली आहे.ईडीने दिलेल्या माहितीनुसार, हा भूखंड कथितरित्या लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर आहे आणि येथे एक मॉल उभारण्यात येणार होता. ही मालमत्ता मनी लाँडरींग नियमांतर्गत अस्थायी स्वरूपात ताब्यात घेण्यात आली आहे. ईडीने गेल्या आठवड्यात लालूप्रसाद यादव यांची पत्नी आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांची या प्रकरणात पाटणा येथे चौकशी केली होती. त्यापूर्वी लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची दोन वेळा चौकशी केली होती. लालूप्रसाद व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांविरुद्ध ईडीने जुलैमध्ये गुन्हा दाखल केला होता. सीबीआयच्या एआयआरमध्ये असा आरोप करण्यात आलेला आहे की, लालूप्रसाद यादव यांनी यूपीए सरकारच्या काळात रेल्वेमंत्री असताना २००४ मध्ये रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशनच्या दोन हॉटेलच्या देखभालीचे काम एका कंपनीला दिले होते. त्यासाठी त्यांनी एका बेनामी कंपनीच्या माध्यमातून पाटणा येथे एक भूखंड लाचेच्या स्वरूपात मिळाला होता. ही कंपनी माजी केंद्रीय मंत्री प्रेमचंद गुप्ता यांची पत्नी सरला गुप्ता यांच्या मालकीची आहे.
लालूप्रसाद यादव यांच्या मालकीचा भूखंड जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2017 4:00 AM