लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली :दिल्लीत आणि देशाच्या काही भागांत स्फोट व दहशतवादी कारवाया करण्याचा पाकिस्तान समर्थक अतिरेक्यांच्या कट दिल्ली पोलिसांनी उधळून लावला आहे. पोलिसांनी ज्या सहा अतिरेक्यांना अटक केली आहे, त्यापैकी दोघांना पाकिस्तानात प्रशिक्षण देण्यात आले होते. या सहा जणांकडून स्फोटके व शस्त्रस्त्रेही ताब्यात घेण्यात आली आहेत. महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान व उत्तर प्रदेशात काही ठिकाणांची रेकीही त्यांनी केली होती.
पोलिसांनी आधी ज्या दोघांना दिल्लीतून तर समीर नावाच्या इसमाला उत्तर प्रदेशातील कोटामधून आणि तिघांना राजस्थान येथून ताब्यात घेण्यात आले. या सहापैकी एक जण महाराष्ट्रातील असल्याचे समजते. सणासुदीच्या काळात आणि निवडणुकांचा प्रचार सुरू झाल्यावर काहींच्या हत्या व विशिष्ट ठिकाणी स्फोट करण्याचा यांचा कट होता, असे पोलिसांनी सांगितले.
१५ दिवसांचे प्रशिक्षण
झीशान आणि ओसामा या दोघांना मस्कतमार्गे पाकिस्तानात पाठवण्यात आले होते. तिथे त्यांना स्फोट घडवणे आणि शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. एके ४७ रायफल कशी चालवावी, हेही शिकविले होते. हे प्रशिक्षण १५ दिवसांचे होते.
अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे उघड
या सहा जणांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचेही पोलीस तपासात आढळले आहे. त्यांची अंडरवर्ल्डमधील काहींशी ओळख करून देण्यात आली होती आणि यांना त्यांची मदत मिळणार होती, असे आतापर्यंतच्या तपासात उघड झाले आहे.
अटक केलेला एक दहशतवादी मुंबईचा टॅक्सीचालक
दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या दहशतवाद्यांपैकी जान मोहम्मद शेख उर्फ समीर कालिया (४७) हा मुंबईतील सायन भागातील रहिवासी असून टॅक्सीचालक आहे. त्याच्या घरी कुटुंबियांची राज्य दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) तसेच गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे. शेख हा सायन येथील सोशननगरमधील केलाबखार परिसरातील खोली क्रमांक १८५ मध्ये दोन मुली आणि पत्नीसोबत येथे राहतो. त्याच्या एका मुलीचे पदव्युत्तर शिक्षण झाले असून, दुसरी मुलगी शाळेत शिक्षण घेत आहे.
१४/१५ जणांचा स्लीपर सेल
- अटक करण्यात आलेल्यांकडून पोलिसांना जी माहिती मिळाली, त्यानुसार बंगाली बोलू शकणाऱ्या १४/१५ जणांचा एक गट आहे.
- त्या सर्वाना दहशती कारवायांचे प्रशिक्षण देण्यात आले असू शकेल.