ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29 - पंतप्रधान नरेंद्र मोदी नववर्षाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित करु शकतात अशी सूत्रांची माहिती आहे. 500 आणि 1 हजार रुपयांच्या नोटा तडकाफडकी चलनातून बाद केल्यानंतर पंतप्रधानांनी 30 डिसेंबरपर्यंतची मुदत मागितली होती. ती मुदत उद्या संपत आहे.
अजूनही चलन तुटवडयाची स्थिती पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही. पंतप्रधानांनी यापुढचे आपले लक्ष्य बेनामी मालमत्ता असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे पंतप्रधान 30 किंवा 31 तारीखला काय बोलणार, कुठली नवीन घोषणा करणार याविषयी सर्वसामान्यांमध्ये उलट-सुलट चर्चा सुरु आहेत.
पंतप्रधान शुक्रवारी कि, शनिवारी बोलणार ते अजून स्पष्ट झालेले नाही. 8 नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर चलन स्थिती सुधारण्यासाठी काय पावले उचलली किंवा काय आव्हाने होती त्याविषयी बोलू शकतात. 50 दिवस म्हणजे 30 डिसेंबरनंतर लोकांचा त्रास हळूहळू कमी होईल असे पंतप्रधान आपल्या जाहीर सभांमधून सांगत आहेत.
30 तारखेनंतर प्रामाणिक माणसांचा त्रास कमी होईल आणि बेईमान लोकांचा त्रास वाढेल असे त्यांनी आधीच जाहीर केले आहे. त्यामुळे पंतप्रधान काय बोलतात याची उत्सुक्ता लागली आहे. निती आयोगाच्या बैठकीमध्ये मंगळवारी मोदींनी अर्थशास्त्री आणि तज्ञांबरोबर सध्याच्या परिस्थितीबद्दल चर्चा केली.