इराकमध्ये आयसिसकडून मारल्या गेलेल्या 38 जणांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारकडून 10 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. पंतप्रधान मोदींनी याबद्दलची घोषणा केली आहे. इराकमधील मोसूल भागात आयसिस या दहशतवादी संघटनेने 39 भारतीयांची हत्या केली होती. यापैकी 38 जणांच्या मृतदेहांचे अवशेष काल (सोमवारी) भारतात आणण्यात आले. यासाठी परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग इराकला गेले होते. इराकमध्ये आयसिसच्या दहशतवाद्यांनी 2014 मध्ये 39 भारतीयांची हत्या केली होती. मारल्या गेलेल्या 39 पैकी एकाचे डीएनए जुळले नाहीत. त्यामुळे 38 जणांचे मृतदेह हवाई मार्गाने भारतात आणण्यात आले. यापैकी 27 जण पंजाबचे, तर चार जण हिमाचल प्रदेशचे रहिवासी होते. उर्वरित सात जण हे पश्चिम बंगाल आणि बिहारचे होते. इराकमध्ये मारल्या गेलेल्या 27 जणांच्या कुटुंबांना काल पंजाब सरकारने प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर केली. याशिवाय त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरीही दिली जाणार आहे. यानंतर आता केंद्र सरकारने मृत पावलेल्या सर्व व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाखांची मदत जाहीर केली आहे. इराकमध्ये मृत पावलेले 39 जण अवैधरित्या भारताबाहेर गेल्याची माहिती काल परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी प्रसारमाध्यमांना दिली. ट्रॅव्हल एजंटच्या माध्यमातून होणारा अवैध प्रवास रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रितपणे काम करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. मृतदेहांचे अवशेष भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारला इतका वेळ का लागला, असा यावेळी प्रश्न सिंग यांना विचारण्यात आला. याबद्दल बोलताना, अजूनही इराकमधील युद्ध पूर्णपणे संपलेले नाही, असे उत्तर त्यांनी दिले. 'इराकमध्ये युद्ध सुरु आहे. या युद्धादरम्यान त्यांच्या सैन्याला मृतदेहांचे अवशेष गाडलेल्या स्थितीत आढळून आले. त्यांचे केस मोठे होते. त्यावरुन ते पंजाबी असल्याची शक्यता निर्माण झाली. यावरुन पुढील तपास करण्यात आला आणि मृतदेहांच्या अवशेषांची ओळख पटली,' असे सिंग यांनी सांगितले.
इराकमध्ये मृत पावलेल्या भारतीयांच्या कुटुंबीयांना सरकारकडून 10 लाखांची मदत जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2018 1:14 PM