ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 26 - रिओ आॅलिम्पिकमध्ये आतापर्यंत सर्वात मोठे भारतीय पथक सहभागी झाल्यानंतरही फक्त दोन पदकांवरच समाधान मानावे लागल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील तीन आॅलिम्पिकच्या तयारीसाठी कृती आराखडा तयार करण्यासाठी कृती समिती स्थापन करण्यात येणार असल्याची शुक्रवारी घोषणा केली.२0२0, २0२४ आणि २0२८ मध्ये होणा-या पुढील आॅलिम्पिकसाठी कृती समिती स्थापन करण्यात येईल. ही कृती समिती आॅलिम्पिकसाठी कृती आराखडा तयार करील.रिओ आॅलिम्पिकमध्ये बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू आणि महिला मल्ल साक्षी मलिक यांच्याद्वारे भारताला फक्त दोनच पदके जिंकता आली होती. सिंधूने रौप्य तर साक्षीने कास्यपदक जिंकले होते.मोदी यांनी शुक्रवारी ही घोषणा केली. ते म्हणाले, आगामी काही दिवसांतच कृती समिती स्थापन केली जाईल. कृती समिती खेळ सुविधा, प्रशिक्षण, निवड प्रक्रिया आणि या बाबीशी निगडित बाबींसाठी पूर्ण आराखडा तयार करील. या कृती समितीत तज्ज्ञांशिवाय अन्य व्यक्तीदेखील असतील.रिओ आॅलिम्पिकमध्ये भारताच्या निराशाजनक कामगिरीनंतर पंतप्रधान काही पावले उचलतील, अशी चर्चा होती. कृती समिती करण्याच्या घोषणनेनंतर या दिशेने उचलले हे एक पाऊल आहे. पुढील आॅलिम्पिक स्पर्धा २0२0 मध्ये जपानच्या टोकियो येथे होणार आहे.भारताने रिओ आॅलिम्पिकमध्ये ११७ सदस्यीय पथक पाठवले होते. त्यात फक्त दोनच पदके जिंकता आली. भारताने याआधी लंडन आॅलिम्पिकमध्ये २ रौप्य आणि चार कास्यपदकांसह एकूण सहा पदके जिंकली होती. पंतप्रधान मोदी यांनी रिओ आॅलिम्पिकमध्ये सहभागी होण्याआधी भारतीय खेळाडूंना वैयक्तिक भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.रिओनंतर केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी २0२0 च्या टोकियो आॅलिम्पिकसाठी आतापासूनच तयारी करण्यावर जोर दिला होता.