बिलासपूर : तुम्ही अनेकदा चोरी झाल्याच्या घटना ऐकल्या असतील. यामध्ये घरातील सोने, रुपये किंवा घरगुती वस्तू चोरीला गेल्याच्या घटना असतील. मात्र, या ठिकाणी घरच चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
बिलासपूरमधील एका 60 वर्षीय महिलेने आपले घर चोरीला गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरांचे वाटप करण्यात आले. या योजनेसाठी महिलेने काही पैसे सुद्धा भरले होते. मात्र, अद्याप तिला घर भेटले नाही. त्यामुळे सध्या या महिलेला कच्च्या घरात राहावे लागत आहे.
या महिलेने घरासाठी 80 हजार रुपयांचा हप्ता सुद्धा भरला आहे. मात्र, तिला अद्याप घर भेटले नाही. यासंबंधीच्या अधिकाऱ्यांशी आमचे बोलणे झाले. परंतू त्यांनी यावर चर्चा करण्याचे टाळले. त्यामुळे आता याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आलो आहोत, असे या गावच्या सरपंचानी सांगितले. तर, तक्रारदार महिला म्हणाली की, सरकारी अधिकाऱ्यांनी माझे घर चोरी केले आहे. वाटप करण्यात आलेल्या घरांसाठी मी पैसे सुद्धा भरले आहेत. मात्र, मला अद्याप घर मिळाले नाही.
गावचे सरपंच म्हणाले, पंतप्रधान आवास योजनेंतर्गत 2018-19 मध्ये गावातील लोकांना 72 घरे वाटत करण्यात आली होती. यामधील 71 घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र, एका घराचा अद्याप पत्ता नाही. हे गायब असलेले घर त्या महिलेचे आहे. याप्रकरणी आम्ही पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी महिलेची तक्रार नोंदवून घेतली असून तपास सुरु केला आहे.