चेन्नई : गेल्या आठवड्यात तमिळनाडूतील कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे आशादायक चित्र दिसत असतानाच तिथे रविवारी एकाच दिवसात १०५ नवे रुग्ण आढळले. यामुळे चिंताग्रस्त झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री इडापड्डी पलानीस्वामी यांना दूरध्वनी करून परिस्थितीचा आढावा घेतला. त्या वेळी राज्यामध्ये आणखी टेस्टिंग किट पाठवा, अशी मागणी पलानीस्वामी यांनी पंतप्रधानांकडे केली. तमिळनाडूमध्ये रुग्णांची संख्या १,४७०वर पोहोचली असून, या साथीमुळे आतापर्यंत १६ जण मरण पावले आहेत. या राज्यातील एका प्रख्यात न्यूरोसर्जनचा रविवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. गेले तीन दिवसांपासून या डॉक्टरांवर रुग्णालयात उपचार सुरू होते. ते आधीपासून इतर व्याधींनीही त्रस्त होते. रविवारी आढळून आलेल्या नव्या रुग्णांमध्ये चेन्नई व परिसरातील ५० रुग्णांचाही समावेश आहे. त्यात दोन पत्रकारही आहेत.तंजावूर जिल्ह्यामध्येही १० नवे रुग्ण आढळून आले आहेत. चेन्नईतील एस्प्लनेड भागात बंदोबस्ताला असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाला ‘कोविड-१९’ची लागण झाली आहे. राजीव गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण घेणारे तीन विद्यार्थी व स्टॅनली वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील एक डॉक्टर अशा चौघांनाही या विषाणूची बाधा झाली आहे.
CoronaVirus: 'त्या' राज्यातल्या वाढत्या संसर्गाची पंतप्रधानांना चिंता; थेट मुख्यमंत्र्यांना कॉल केला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 1:27 AM