नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. या कोरोनावर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दान करण्याचे आवाहन केले आहे. तेव्हापासून देशवासीय कोरोनाचा सामना करण्यासाठी आपल्या परिस्थितीनुसार दान करत आहेत. या कोरोना लढाईत सरकारचे हात बळकट करण्यासाठी सर्वसामान्यांपासून ते व्हीव्हीआयपर्यंत आणि बड्या संस्थांनी पंतप्रधान केअर्स फंडमध्ये (PM Cares Fund ) दान केले आहे.
PM Cares Fund संबंधित एक मजेशीर प्रकरण समोर आले आहे. ट्विटरवरून एका फैज अहमद नावाच्या युजर्सने पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थ मंत्रालय आणि राष्ट्रपती भवनाला ट्विट केले की, त्यांच्या वडिलांनी चुकून पीएम केअर्स फंडात एक हजार रुपयांऐवजी 10,000 रुपये दान केले. पण, एवढी मोठी देणगी आपण देऊ शकत नाही, असे फैज अहमद यांनी ट्विट केले. तसेच, त्यांनी आपल्या ट्विटमध्ये NPCI, RuPay यांनाही टॅग केले. फैज अहमद यांनी हे ट्विट 15 मे रोजी केले होते.
या ट्विटनंतर 8 ऑगस्ट शनिवारी फैज अहमद यांनी त्यांना आणखी एक ट्विट केले. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून 9 हजार रुपये परत आल्याचे सांगितले आहे. त्यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, "पीएम केअर्स, काही दिवसांपूर्वी आमचे 9 हजार रुपये परत केल्याबद्दल धन्यवाद." विशेष म्हणजे, फैज अहमद यांनी केलेले ट्विटला RuPay च्या ट्विटर हँडल @RuPay_npci द्वारे लाइक केले आहे.
दरम्यान, कोरोना व्हायरसचा धोका हा दिवसागणिक वाढत आहे. जगभरातील कोरनाग्रस्तांची संख्या ही एक कोटीच्या वर गेली असून तब्बल सहा लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यानंतर आता देशातही कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून देशातील रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली असून चिंता वाढवणारी आकडेवारी पुन्हा एकदा समोर आली आहे.