नवी दिल्ली : पीएम केअर्स फंड एनडीआरएफमध्ये ट्रान्सफर करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी स्वागत केले. यावेळी पंतप्रधान केअर्स फंडमधून कोरोनाच्या लढाईत आतापर्यंत 3100 कोटी रुपयांची मदत झाली आहे. त्यापैकी दोन हजार कोटी रुपयांचे व्हेंटिलेटर खरेदी करण्यात आले, असे रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले, "50 हजार व्हेंटिलेटर खरेदी करण्यात आले असून स्वातंत्र्यानंतरची ही सर्वात मोठी खरेदी आहे. स्थलांतरित मजुरांना मदत करण्यासाठी एक हजार कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले. लस संशोधनासाठी 100 कोटी रुपये देण्यात आले. पीएम कॅअर्स फंड पब्लिक ट्रस्ट आहे आणि त्याचे प्रमुख पंतप्रधान आहेत."
लोकांनी स्वेच्छेने पीएम केअर्स फंडसाठी देणगी दिली. गेल्या 6 वर्षात मोदी सरकारवर कोणतेही भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले नाहीत. सर्व गोष्टी पारदर्शकतेने घडत आहेत, असे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले. याशिवाय, काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लक्ष्य करत रविशंकर प्रसाद म्हणाले, "कोरोनाविरूद्धच्या लढाईत राहुल गांधींनी पहिल्या दिवसापासूनच देशाला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला आहे."
याचबरोबर, पंतप्रधानांनी डॉक्टर, नर्स आणि कोरोनाचा सामना करणाऱ्यांसाठी थाळी वाजविण्यासाठी सांगितले, तर राहुल गांधी यांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पंतप्रधानांच्या सांगण्यावरून जेव्हा संपूर्ण देशाने कोरोनाविरूद्ध आशेचा दीप प्रज्वलित केला तेव्हा राहुल गांधी म्हणाले, तुम्ही ते का पेटवित आहात? राहुल गांधींनी कोरोना लढा कमकुवत करण्यासाठी कसलीही कसर सोडली नाहीत, असा आरोप करत केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.
दरम्यान, आज सर्वोच्च न्यायालयाने पीएम केअर्स फंडविरोधात दाखल केलेली याचिका फेटाळून लावत म्हटले आहे की, नोव्हेंबर 2019 मध्ये तयार करण्यात आलेले एनडीआरएफ कोरोना संकटाला तोंड देण्यासाठी पुरेसे आहे. कोणतीही नवीन कृती योजना आणि किमान मानकांना वेगळे करण्याची आवश्यकता नाही.