नवी दिल्ली: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाल्यापासून पेगॅससच्या माध्यमातून झालेल्या कथित हेरगिरीचा मुद्दा विरोधकांनी लावून धरला आहे. पॅगेससवरून चर्चेची मागणी करत विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज अनेकदा तहकूब करण्यात आलं. यानंतर आता विरोधकांनी संसदेबाहेर पत्रकार परिषद घेत सरकारवर गंभीर आरोप केले. पेगॅससच्या माध्यमातून करण्यात आलेली हेरगिरी म्हणजे देशद्रोहच असल्याचं म्हणत काँग्रेस खासदार राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट निशाणा साधला.
संसदेत सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी आज विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली. त्यात जवळपास डझनभर पक्षाच्या नेत्यांचे सहभागी होते. या बैठकीनंतर राहुल गांधींनी मोदी सरकारवर शाब्दिक हल्ला चढवला. 'संसदेत विरोधकांचा आवाज दाबला जात आहे. मोदी सरकारनं पेगॅसस खरेदी केलं की नाही आणि पेगॅसस हत्याराचा वापर आपल्याच लोकांविरुद्ध केला की नाही, या प्रश्नांची उत्तरं सरकारनं द्यावीत,' असं राहुल गांधी म्हणाले.
'माझ्याविरोधात, सर्वोच्च न्यायालयाविरोधात, माध्यमांविरोधात, सामाजिक कार्यकर्त्यांविरोधात पेगॅसस हत्याराचा वापर करण्यात आला. सरकारनं हे का केलं, याचं उत्तर त्यांनी द्यावं. आम्ही संसदेचं कामकाज रोखलेलं नाही. आम्ही आमचा आवाज बुलंद केला आहे. ज्या शस्त्राचा वापर दहशतवाद्यांविरोधात करायचा, त्याचा वापर आमच्याविरोधात का केला जात आहे? सरकारनं पेगॅसस का खरेदी केलं?', असे प्रश्न राहुल यांनी उपस्थित केले.