नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १९ जून रोजी सर्वपक्षीय बैठक बोलविली आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी एक राष्ट्र एक निवडणूक मुद्दावर चर्चा करण्याची शक्यता आहे. त्यानंतर २० जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांसोबत चर्चा करणार आहेत. मोदी सरकार पहिल्यापासूनच एक राष्ट्र एक निवडणूक मुद्दावर आग्रही आहे. आता याच्या अंमलबजाणीसाठी मोदींनी बैठक बोलविली आहे.
यापूर्वी केंद्र सरकारने नवनिर्वाचित लोकसभेच्या पहिल्या सत्राच्या एकदिवस आधी १६ जूनला सर्वपक्षीय बैठक बोलविली आहे. सरकारने या सत्रात महत्त्वपूर्ण विधेयकं मंजूर करून घेण्यासाठी विरोधकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये तीन तलाकचे विधेयक देखील आहे. ज्याला केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.
संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी आणि इतर अनेक नेत्यांनी युपीए अध्यक्षा सोनिया गांधी आणि गुलाब नबी आझाद यांच्यासहित विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली. तसेच संसदेचं सत्र शांततेत पार पाडू देण्याचे आवाहन केले.
काँग्रेसकडून कायम एक राष्ट्र निवडणूकला नेहमीच विरोध करण्यात आला आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये देखील काँग्रेसने याला विरोध केला होता. तसेच काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी या मुद्दावर विधी आयोगासमोर असहमती दर्शविली होती. एकसोबत निवडणूक भारतीय संघवादी धोरण्याच्या विरोधात असल्याचे काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले होते. दुसरीकडे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी मात्र एक राष्ट्र एक निवडणूकला पाठिंबा दर्शविला होता.