Pm Modi America visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान मोदी यापूर्वी अनेकवेळा अमेरिकेला गेले आहेत, मात्र यंदाचा दौरा संरक्षण क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या दौऱ्यात भारत आणि अमेरिका फायटर जेट इंजिनबाबत मोठा करार करणार आहेत. हा करार झाल्यास, जेट फायटर इंजिन तयार करणारा भारत जगातील पाचवा देश बनेल. आतापर्यंत फक्त अमेरिका, ब्रिटन, रशिया आणि फ्रान्स या क्षेत्रात आहेत. तंत्रज्ञानासाठी महाकाय मानला जाणारा चीनदेखील जेट इंजिन स्वतः बनवत नाही.
या कराराद्वारे मोदी सरकारलाही आपले आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. हा करार झाल्यास, जेट इंजिन तयार करणारा भारत हा आशियातील एकमेव देश ठरेल. या कराराबाबत भारताची अमेरिकेशी दीर्घकाळापासून चर्चा सुरू आहे. आता यावर पीएम मोदींच्या दौऱ्यात शिक्कामोर्तब होऊ शकते, असे मानले जात आहे.
हा करार भारतासाठी का महत्त्वाचा ?आत्तापर्यंत अमेरिका कोणाशीही संरक्षण तंत्रज्ञान शेअर करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करत होते. अमेरिकेनेही संरक्षण तंत्रज्ञान आपल्या भागीदार देशांशीही शेअर केलेले नाही. मात्र भारत अमेरिकेसोबत जेट इंजिन बनवण्यासाठी तंत्रज्ञान हस्तांतरित करण्याचा आग्रह धरत आहे. या संदर्भात फेब्रुवारीमध्ये भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि अमेरिकन जॅक सुलिव्हन यांच्यात चर्चाही झाली आहे. आता पुढील आठवड्यात अमेरिकेचे संरक्षण मंत्री भारतात येत आहेत. या कराराबाबत दोन्ही देशांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.
अमेरिकन दौऱ्यावर मोठी घोषणा होऊ शकतेपंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्याच्या 21 ते 24 तारखेपर्यंत अमेरिका दौऱ्यावर आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पंतप्रधान मोदींना दौऱ्याचे निमंत्रण दिले होते. आता या दौऱ्यावर कराराबद्दल चर्चा होऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या करारासाठी भारत आणि अमेरिकेतील कंपन्यांचीही निवड करण्यात आली आहे. सरकारी कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भारकच्या बाजूने नेतृत्व करेल, तर जनरल इलेक्ट्रिक अमेरिकेच्या बाजूने असेल. या दोन कंपन्यांच्या भागीदारीअंतर्गत दोन्ही कंपन्या मिळून देशांतर्गत स्तरावर फायटर जेट इंजिनची निर्मिती करतील.
डिफेन्स मेगाडेलकडून काय मिळणारभारत आणि अमेरिका यांच्यातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा संरक्षण करार असेल, असे मानले जात आहे. या करारानंतर दोन्ही देशांच्या संरक्षण क्षेत्रात क्रांतिकारी बदल पाहायला मिळतील. या करारानंतर एकीकडे भारताला स्वदेशी फायटर इंजिन बनवता येणार आहे, तर दुसरीकडे आगामी काळात पाण्यातील मोठ्या जहाजांची इंजिनेही देशात तयार होणार आहेत. रशिया-युक्रेन युद्धात संपूर्ण जगासह भारतालाही एक धडा मिळाला की स्वावलंबी असणे किती महत्त्वाचे आहे. भारताला शस्त्रास्त्रांसाठी फक्त रशियावर अवलंबून राहण्याची गरज नसेल.