नवी दिल्ली : आंध्र प्रदेशमधील सत्ताधारी तेलगू देसम पार्टीचे (टीडीपी) नेते आणि अर्थमंत्री यनामाला रामकृष्नुदु यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना 'अॅनाकोंडा'सोबत केली आहे.
एएनआयच्या वृत्तानुसार, यनामाला रामकृष्नुदु म्हणाले की, मोदींपेक्षा मोठा अॅनाकोंडा कोणी आहे का? नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय संस्थांना गिळंकृत करणारे अॅनाकोंडा आहेत.
यनामाला रामकृष्नुदु यांनी नरेंद्र मोदींची तुलना थेट अॅनाकोंडाशी केली आहे. मोदी हे सर्व सरकारी संस्था गिळंकृत करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. देशाला भाजपापासून वाचवणे हे आमच्या पार्टीचे कर्तव्य आहे. देश, लोकशाही आणि संवैधानिक मूल्ये जपण्याची प्राथमिक जबाबदारी आपली प्रत्येकाचीच आहे, असे सांगत यनामाला रामकृष्नुदु यांनी भाजपासह, वायएसआर काँग्रेस आणि जनसेनेवर टीका केली.
दरम्यान, यनामाला रामकृष्नुदु यांच्या विधानावर भाजपानेही सडेतोड उत्तर दिले आहे. एन चंद्राबाबू नायडू हे 'भ्रष्टाचाराचे राजा' आहेत. त्यांनी केलेला भ्रष्टाचार आता उघड होईल, असे भाजपाने म्हटले आहे.