नवी दिल्ली- राजस्थान, मध्य प्रदेश आणि तेलंगणातल्या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांसंदर्भात भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्यासह भाजपाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. दिल्लीतल्या भाजपाच्या कार्यालयात आगामी निवडणुकीसाठी जागांच्या वाटपासंदर्भात चर्चा झाली. बैठकीत मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणात होणा-या विधानसभा निवडणुकीतल्या उमेदवारांच्या नावांबाबत चर्चा झाली. त्यामुळे भाजपा आज छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणातल्या विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा करणार आहे.मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री आणि आमदारांच्या खराब कामगिरीसंदर्भात चर्चा झाली. कैलाश विजयवर्गीय विधानसभा निवडणूक लढणार नाहीत. ते स्वतःच्या मुलासाठी मोर्चेबांधणी करत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, जवळपास मध्य प्रदेशातील 40 विधानसभा आमदारांना घरी बसवलं जाणार आहे. त्यामध्ये काही मंत्र्यांचाही समावेश आहे. तसेच भाजपा जवळपास अर्ध्या डझनांहून अधिक खासदारांना या विधानसभा निवडणुकीत उतरवण्याची शक्यता आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजेंनीही 80 उमेदवारांची याची केंद्रीय नेतृत्वाला सोपवली आहे. परंतु राज्य आणि केंद्र सरकारमध्ये या उमेदवारांच्या नावावर अद्याप सहमती झालेली नाही.
राज्य सरकार आणि स्थानिक आमदारांविषयी लोकांमध्ये असलेल्या रागाचा फटका बसू नये, यासाठी भाजपने राजस्थानात किमान 80 ते 100 नव्या उमेदवारांना संधी देण्याचे ठरविल्याचे समजते. म्हणजेच विद्यमान 80 ते 100 आमदारांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे. गेल्या विधानसभेत 200 पैकी 160 जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले होते. काँग्रेसने 25 जागांवर विजय मिळवला होता आणि अन्य पक्ष व अपक्ष मिळून 15 जागांवर विजयी झाले होते. इतके स्पष्ट बहुमत पाच वर्षांपूर्वी मिळालेल्या भाजपला यंदाची निवडणूक खरोखरच अवघड वाटत आहे. मध्य प्रदेशातील 60 ते 70 विद्यमान आमदारांची तिकिटे कापण्याचेही भाजपने ठरविले आहे.